स्मार्ट सिटीच्या खोदकामाचा अडथळा सुरुच; पुन्हा बीएसएनएलचा केबल ताेडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2023 03:31 PM2023-12-15T15:31:59+5:302023-12-15T15:32:12+5:30
पणजी शहरात स्मार्ट सिटीची कामे केली जात असताना कुठलेच योग्य नियाेजन केले जात नाही.
- नारायण गावस
पणजी: राजधानी पणजी शहरात स्मार्ट सिटीची कामे सुरु आहेत. येत्या ७ महिन्यांत पणजीतील ही सर्व कामे पूर्ण करण्याचे आव्हान कंत्राटदारासमोर आहे. त्यामुळे कामगारांकडून जलदगतीने कामे केली जात आहेत. याचा परिणाम म्हणून अनेक वेळा ताेडातोडही होत आहे. सकाळी गटाराचे खाेदकाम सुरु असताना बीएसएनएलचा केबल तोडण्यात आला. यामुळे काही बॅँकची इंटरनेट सेवा काही तास बंद हाेती. त्याचप्रमाणे या अगोदर पाण्याची पाईपलाईन अनेक वेळा फोडली गेली आहे.
पणजी शहरात स्मार्ट सिटीची कामे केली जात असताना कुठलेच योग्य नियाेजन केले जात नाही. मिळेल तिथे खोदले जात आहे. शहरातील प्रमुख रस्ते सध्या खोदले आहेत. गटार खाेदण्याची कामे घाईगडबडीत केली जात आहेत. काही दिवसांपूर्वी रायबंदर येथे स्मार्ट सिटीचे काम करत असताना गटारात पडून एका कामगाराचा मृत्यू झाला होता. तर या अगोदर अनेक वेळा वाहनचालकांचे या खड्ड्यात पडून अपघात झाले आहेत. अनेक वेळा पाण्याचे टॅँकर तसेच इतर माेठी अवजड वाहने या खड्ड्यात रुतून पडली होती. पण तरीही स्मार्ट सिटीची काम नियाेजन पद्धतीने केली जात नाही.
पणजीचे आमदार तसेच महापौर या विषयी गंभीर दिसत नाही. स्मार्ट सिटीच्या कामाविषयी विचारल्यावर ते प्रत्येक वेळी लाेकांनी काही काळ कळ साेसावी असे सांगतात. पण सर्वसामांन्याच्या भावना कोणीच ऐकून घेत नाही. स्मार्ट सिटीसाठी केंद्र सरकार व राज्यसरकारकडून करोडो रुपये निधी आला आहे. तो खर्च करण्यासाठी विविध प्रकल्प बांधले जात आहेत. अजूनही स्मार्ट सिटीची ५० टक्के कामे ही बाकी आहेत.