सादिक बेळ्ळारी खून प्रकरणातील सातवा संशयितही गजाआड
By सूरज.नाईकपवार | Published: October 1, 2023 01:26 PM2023-10-01T13:26:02+5:302023-10-01T13:26:53+5:30
१ सप्टेंबर रोजी सादिकचा रुमडामळ येथे त्याच्या राहत्या घरात सकाळी धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता
मडगाव: सादिक बेळ्ळारी खून प्रकरणात सातव्या संशयितालाही गोव्यातील मायणा कुडतरी पोलिसांनी जेरबंद केले. मुझ्झफर हकीम उर्फ मुज्जु (२३) असे या संशयिताचे नाव असून, तो मूळ कर्नाटकातील सौनुर येथील आहे. तो चंद्रवाडा फातोर्डा येथे रहात होता. शनिवारी रात्री मायणा कुडतरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मुज्जुची सोनरवाडा राय येथे मुसक्या आवळल्या.
१ सप्टेंबर रोजी सादिकचा रुमडामळ येथे त्याच्या राहत्या घरात सकाळी धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. भगवती काॅलनीत दोन वर्षापुर्वी मुझाहिद खानजादे याचा खून झाला होता. सादीकही या खूनात सहभागी होता. या खूनाचा बदला म्हणून नंतर त्याचा गेम करण्यात आला होता.
कादर खानजादे, तौसिफ कडेमणी, जावेद पानवाले, सुलेमान सिकंदर , रिहाल पानवाले व कबीर खानजादे या सहाजणांना यापुर्वीच पोलिसांनी अटक केली होती. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आता सातवा संशयितही पोलिसांच्या पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.
भांदसंच्या ३०२ व १२० (ब) कलामखाली सर्व संशयितांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे