भारतीय संगीताचा आत्मा हरपला; देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात वाहिली आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2022 01:15 PM2022-02-06T13:15:58+5:302022-02-06T13:17:32+5:30
फडणवीस म्हणाले की, भारतीय संगीताचे हे दैवत आमच्यात नाही ही कल्पनाच करवत नाही.
पणजी : गोव्यात सध्या निवडणुकीनिमित्त असलेले महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लतादीदींच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करताना लतादीदींच्या निधनाने केवळ स्वर नाहीत तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे, असे म्हटले आहे.भाजपच्या गोवा मुख्यालयात लतादीदींना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम झाला. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर व इतर नेते याप्रसंगी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, भारतीय संगीताचे हे दैवत आमच्यात नाही ही कल्पनाच करवत नाही. ईश्वराने भारताला दिलेली अमूल्य देणगी हिरावून घेतली आहे.‘ऐ मेरे वतन के लोगो’तून प्रत्येकाच्या अश्रूंना वाट मोकळी करून देण्याचे सामर्थ्य जसे त्यांच्या सुरांमध्ये होते, तसेच अनेकांच्या आयुष्यातील स्वप्नांना आणखी उंच भरारी घेण्यासाठी बळ देण्याचे काम लतादिदींच्या सुरांनी केले.
फडणवीस म्हणाले की, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निस्सिम भक्ती आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी जपली. वीर सावरकरांच्या विचारांची तन-मन-धनाने सेवा करण्याचे काम लतादीदींनी केले. प्रखर राष्ट्रवाद जपणारे हे संपूर्ण मंगेशकर कुटुंब लतादीदींनी कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून जपले. विविध कार्यक्रमांमध्ये अनेकदा त्यांची भेट व्हायची. प्रत्येकवेळी आपुलकीने विचारपूस असायची. भेट झाली नाही, तर फोन करून ‘कसा आहेस देवेंद्र’ हे शब्द मोठ्या बहिणीची उणीव भरून काढणारे असायचे. त्यांचे जाणे, ही माझी सुद्धा वैयक्तिक आणि मोठी हानी आहे.’
लतादीदींच्या जाण्याचे अतीव दु:ख- भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे
भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी तीव्र शोक व्यक्त करताना असे म्हटले आहे की,‘लतादीदींच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्राचे खास करून चित्रपट संगीत क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. लतादीदींचे वडील दीनानाथ मंगेशकर हे मूळचे गोव्याचे. यामुळे लतादीदींचे गोव्याशी कौटुंबिक नाते होते. संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान पुढील कैक पिढ्या विसरता येणार नाहीत.’