राज्यात अवकाळी पावसाचा फटका, ठिकठिकाणी वीज पडल्याने नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 02:41 PM2023-11-08T14:41:59+5:302023-11-08T14:43:51+5:30
वीजेच्या गडगडाटासह जोराचा पाऊस
नारायण गावस, पणजी (गोवा): आज पहाट विजेच्या गडगडाटासह सुरू झालेला अवकाळी पावसाने राज्यभर हाहाकार घातला. बहुतांश ग्रामीण भागांपासुन शहरी भागातही या पावसाचा परिणाम जाणवला. यामुळे आज सकाळपासून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. सत्तरी, डिचाेली तालुक्यातील अनेक गावांना याचा फटका बसला. तसेच शहरी भागांतील रस्ते पाण्याखाली गेले होते. अनेक भागांमध्ये पडझडीच्या घटनाही समाेर आल्या आहेत.
वीजेच्या गडगडाटासह जोराचा पाऊस
गोवा हवामान खात्याने दाेन दिवस येलो अलर्ट दिला होता. पण सोमवार व मंगळवार दोन दिवसांपासून गोव्यातील उष्णतेचा पारा चांगलाच चढला होता. मंगळवारी मध्यरात्री अचानक सर्वत्र गडगडाटासह पाऊस सुरु झाल्याने सर्वांना फटका बसला आहे. वीज पडल्याने अनेक ठिकाणी वीज गुल झाली होती. यामुळे अनेकांच्या साहित्याचेही नुकसान झाले.
नरकासूर प्रतिमांवर पावसाचा फटका
दिवाळीला मोजकेच दाेन दिवस शिल्लक असल्याने राज्यात माेठमाेठे नरकासुर करायला सुरु झाले आहेत. अनेक युवा संघांनी माेठमाेठे नरकासुर तयार केले होते. पण मध्यरात्री अचानक पाऊस झाल्याने अनेक नरकासूरांच्या प्रतिमा भिजल्या आहेत. काही जणांना रात्री उशीरा त्यांच्यावर प्लास्टीकचे कवर घातले. तसेच पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता असल्याने दिवाळीवर याचा परिणाम जाणवू शकतो.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांवर परिणाम
राज्यात गेल्या पंधरा दिवसापासून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरु आहेत. पण अचानक पाऊस सुरु झाल्याने याचा फटका या स्पर्धावर जाणवला मुसळधार पाऊस झाल्याने पणजील प्रमुख कांपाल मैदानावर पाणी साचले होते. यामुळे या ठिकाणी काही स्पर्धा रद्द करण्यात आल्या. तसेच इतर अनेक ठिकाणी पावसाचा क्रीडा स्पर्धावर परिणाम दिसून आला.
इफ्फीच्या तयारीवर परिणाम
इफ्फीला फक्त १२ दिवस शिल्लक असल्याने इप्फीची तयारीही जोरात सुरु आहे. इफ्फीचे प्रमुख ठिकाण असलेल्या. गोवा मनोरंजन संस्थेच्या आवारात दिखाव्याचे काम सुरु होते. पण पावसामुळे या कामावर याचा परिणाम झाला आहे. सजावटी काम नुकतेच हाती घेतले होते. पण अचानक पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पावसाचा पणजीत स्मार्ट सिटीच्या खोदलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने चिखल झाला होता. त्यामुळे अनेक वाहन चालकांनाही याचा त्रास सहन करावा लागला.