पर्वरीत आले तिळारीचे पाणी, बार्देश तालुक्याला दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 04:42 PM2024-01-03T16:42:01+5:302024-01-03T16:42:42+5:30
या जलशुद्धीकरण प्रकल्पांना होणारा पाणी पुरवठा १३ नोव्हेंबरपासून बंद झाला होता.
पर्वरी : तिळारी कालव्याच्या दुरूस्तीच्या कामानंतर अस्नोडा व पर्वरी जलशुध्दीकरण प्रकल्पांना धरणातून होणारा पाणी पुरवठा बुधवारपासून सुरळीत झाला आहे.
या जलशुद्धीकरण प्रकल्पांना होणारा पाणी पुरवठा १३ नोव्हेंबरपासून बंद झाला होता. तब्ब्बल अठरा दिवस बार्देश तालुक्याला अपुऱ्या पाणी पुरवठ्यासह टंचाईला सामोरे जावे लागले. अनेकवेळा टँकरने पाणी देण्यात आले. दुरुस्तीच्या कामानंतर एक जानेवारी रोजी तिळारीचे पाणी बार्देश तालुक्यात पोहोचले. मात्र, दुरुस्तीच्या आणखी काही कामांमुळे दोन दिवस पुरवठा करण्यात आला नव्हता. आता बुधवारपासून पाणी पुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
यासंदर्भात बांधकाम खात्याच्या पाणी विभागाचे सहा. अभियंता रायकर यांनी सांगितले की, ‘आता तिळारी कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. आता पर्वरीत नियमित पाणी पुरवठा होईल. तूर्तास पुंडलिकनगर, तोर्डा, बिठठोण आणि इतर भागात पाणी पुरवठा चालू केला आहे. कोणताही अडथळा आला नाही तर पर्वरी, साळगाव येथील नागरिकांना नियमित पाणी पुरवठा होणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.