मंत्री अन् आमदारांमधील संघर्षात झोनिंग आराखडा स्थगित
By वासुदेव.पागी | Published: October 9, 2023 05:25 PM2023-10-09T17:25:20+5:302023-10-09T17:25:33+5:30
नवीन आराखडा बनविताना कोणत्याही पद्धतीची घाई केली जाणार नाही असे त्यांनी सांगितले.
पणजीः पेडणेचा झोनिंग आराखड्याच्या मुद्द्यावरून नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे आणि मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्यात जुंपली असतानाच, नगर नियोजनमंत्री राणे यांनी हा झोनिंग आराखडा अनिश्चित काळासाठी स्थगित ठेवण्यात आल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे मांद्रेचे सरपंच आणि पंच सदस्यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली आहे.
झोनिंग आराखडा स्थगित करण्याचा निर्णय हा आपण आणि केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करूनच घेतल्याचे राणे यांनी म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी जसा प्रादेशीक आराखडा २०२० स्थगित ठेवला होता नेमका तसाच पेडणेचा झोनिंग आराखढा स्थगित ठेवल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. नवीन आराखडा हा पेडणेतील लोकांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या सूचना लक्षात घेऊनच बनविला जाणार आहे. नवीन आराखडा बनविताना कोणत्याही पद्धतीची घाई केली जाणार नाही असे त्यांनी सांगितले.
मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्याशी नगर नियोजन मंत्र्यांचा झालेल्या वादाच्या पार्श्वभुमीवर पेडणेचा आराखडा स्थगित ठेवण्यात आल्यामुळे जीत यांनी केलेल्या आरोपामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे का असा प्रश्न राणे यांना पत्रकारांनी विचारला. तेव्हा राणे म्हणाले की कुणी काय आरोप करतो यावर अवलंबून आपण कधघीच निर्णय घेत नसतो. पेडणेच्या झोनिंग आराखड्याच्या बाबतीत पेडणे तालुक्यातील अनेक लोकांनी नगर नियोजन खात्याकडे तक्रारी केल्या होत्या. तक्रारी करतानाच अत्यंत वस्तुनिष्ठ आणि गंभीर समस्याही मांडल्या होत्या. त्यामुळे लोकांच्या हितासाठीच हा आराखडा स्थगित ठेवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. आल्तिनो येथील वनभवन इमारतीत घेतलेल्या या पत्रकार परिषदेत मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे आणि स्थानिक सरपंच, उपसरपंच आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
मी तसला मंत्री नाही
राजकीय संघर्षामुळे पेडणेचा झोनिंग आराखडा स्थगित ठेवण्यात आला आहे काय असा प्रश्न विचारला असता मंत्री म्हणाले की, मी तसला मंत्री नाही. माझे एक वेगळे चारित्र्य आहे. मी काही माजी नगर नियोजन मंत्र्यांसारखा नाही. त्यामुळे आराखडा स्थगित ठेवण्याच्या निर्णयाशी कोणतीही राजकीय कारणे तुम्ही जोडू नका.