सात दिवसात तिसरे विद्यालय लुटले, गोव्यात चोरट्यांचा सुळसुळाट
By पंकज शेट्ये | Published: March 11, 2024 05:46 PM2024-03-11T17:46:27+5:302024-03-11T17:48:12+5:30
दाबोळी येथील केशव स्मृती विद्यालयात चोरट्यांनी केला हात साफ.
पंकज शेट्ये,वास्को: गेल्या सात दिवसात मुरगाव तालुक्यातील तिसऱ्या विद्यालयात अज्ञात चोरट्यांनी घुसून चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. दाबोळीतील केशव स्मृती माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या इमारतीच्या गॅटचे टाळे फोडून अज्ञात चोरट्यांनी विद्यालयात प्रवेश करून २५ हजाराची रोख रक्कम लंपास करण्याबरोबरच २५ हजाराच्या मालमत्तेची नासधूस केली. सात दिवसात मुरगाव तालुक्यातील तिसऱ्या विद्यालयात अज्ञात चोरट्यांनी हात साफ केल्याने मुरगाव तालुक्यातील इतर विद्यालयांच्या सुरक्षेबाबत अनेकांना चिंता निर्माण झाली आहे.
केशव स्मृती माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक सुष्मा कोरगावकर यांच्याकडून मिळालेल्या माहीतीनुसार सोमवारी (दि.११) सकाळी विद्यालय उघडल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. सकाळी आम्ही विद्यालयात आलो असता माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक विद्यालयाची दोन्ही प्रशासकीय कार्यालये अज्ञात चोरट्यांनी फोडून आतील सामान - कागदपत्रे अस्थाव्यस्त टाकून दिल्याचे आढळून आले. तसेच उच्चमाध्यमिक आणि माध्यमिक विद्यालयाच्या दोन्ही प्रशासकीय कार्यालयातील कपाटे अज्ञात चोरट्यांनी फोडून आत असलेली सुमारे २५ हजाराची रक्कम लंपास केल्याचे आढळून आले. त्या व्यतिरिक्त चोरट्यांनी विद्यालयातील माझ्या आणि सहाय्यक मुख्याध्यापक राजेश्री जाधव यांच्या कार्यालयाच्या मुख्य दरवाजांचे टाळे फोडून आत प्रवेश केल्याचे आढळून आल्याची माहीती मुख्याध्यापक सुष्मा कोरगावकर यांनी दिली.
आमच्या कार्यालयात पैसे नसल्याने त्यांना तेथून काहीच चोरण्यासाठी मिळाले नाही, मात्र आमच्या कार्यालयातील सामानसुद्धा चोरट्यांनी अस्थाव्यस्त टाकल्याचे दिसून आले. २५ हजाराची रोख रक्कम लंपास करण्याबरोबरच चोरट्यांनी विद्यालयातील कपाटांची नासधून करण्याबरोबरच कार्यालयाच्या दरवाजांचे टाळे फोडणे, गॅटचे टाळे फोडणे असे प्रकार करून विद्यालयाच्या थोड्या मालमत्तेला नुकसानी पोचवली आहे. आमच्या विद्यालयाला चोरीमुळे सुमारे ५० हजाराची नुकसानी झाल्याची माहीती मुख्याध्यापक कोरगावकर यांनी दिली. वास्को पोलीसांना चोरीची माहीती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन पंचनामा केला. सात दिवसात मुरगाव तालुक्यात घडलेल्या तीन विद्यालयातील चोरी प्रकरणातील चोरट्यांना शोधून त्यांना गजाआड करण्यासाठी पोलीस सर्व मार्गाने चौकशी करत असून चोरट्यांना गजाआड करण्यासाठी पोलीसांना यश मिळते की नाही ते येणाऱ्या दिवसात समजणार आहे.
ह्या चोरीत सीसीटीव्ही डीव्हीआर पळवले नाहीत - मुरगाव तालुक्यातील पूर्वीच्या दोन विद्यालयात झालेल्या चोरी प्रकरणात अज्ञात चोरट्यांनी मालमत्तेसहीत सीसीटीव्ही कॅमेराचे डीव्हीआर सुद्धा गायब केले होते. मात्र केशव स्मृती विद्यालयात चोरी केलेल्या अज्ञात चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा डीव्हीआर लंपास केले नसल्याची माहीती प्राप्त झाली. ४ मार्चला मांगोरहील, वास्को येथील सेंट तेरेसा विद्यालयात अज्ञात चोरट्यांनी घुसून १ लाखाची रक्कम लंपास करण्याबरोबरच सुमारे ३० हजाराचे सीसीटीव्ही कॅमेरा डीव्हीआर सुद्धा लंपास केले होते. ७ मार्चला वेळसांव येथील इन्फन्ट जीझस अकादमी विद्यालयात चोरट्यांनी घुसून तेथील रोख रक्कम आणि डीव्हीआर मिळून सुमारे ६५ हजाराची मालमत्ता लंपास केली होती.
मुरगाव तालुक्यात सात दिवसात तीन विद्यालयात चोरीच्या घटना घडलेल्या असून त्यापूर्वी गोव्याच्या अन्य काही भागातील विद्यालयात सुद्धा चोरीचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे विद्यालयांच्या सुरक्षेसाठी शिक्षण खात्याने रात्रीच्या वेळी विद्यालयांना सुरक्षा रक्षक द्यावा अशी मागणी होत आहे.
विद्यालयात घुसले दोन चोर - केशवस्मृती विद्यालयात चोरीसाठी आलेल्या चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरांचा डीव्हीआर लंपास केला नसल्याने विद्यालयात दोन चोरटे चोरीसाठी घुसल्याचे फुटेजवरून उघड झाले आहे. त्या अज्ञात चोरट्यांनी चेहऱ्यावर मास्क घालून त्यांचा चेहरा लपवला होता असे फुटेजवरून उघड झाल्याची माहीती विद्यालयातील विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. केशव स्मृती विद्यालयात झालेल्या चोरीच्या त्या सीसीटीव्ही फुटेजचा चोरट्यांना गजाआड करण्यासाठी वास्को पोलीसांना कीतपत फायदा होतो ते येणाऱ्या दिवसात कळणार.