‘...तर मी साहित्य संमेलनाचे निमंत्रणच नाकारले असते’ -ज्ञानपीठ विजेते दामोदर मावजो
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 06:23 AM2022-04-20T06:23:20+5:302022-04-20T06:25:01+5:30
गोव्यात अनेक वर्षे मराठी विरुद्ध कोंकणी असा वाद सुरू आहे. १९८७ साली उफाळलेल्या वादावेळी काहींचे बळीही गेले. गोव्यात मराठी राजभाषा नको, अशी भूमिका ज्या कोंकणी लेखकांनी घेतली त्यात मावजो यांचाही समावेश होतो.
सदगुरू पाटील -
पणजी : मी मराठीद्वेष्टा नाही. उलट मला मराठी भाषेविषयी जास्तच आदर आहे. मी मराठीद्वेष्टा असतो तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण नाकारले असते, असे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ गोमंतकीय लेखक दामोदर मावजो यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीवेळी सांगितले.
गोव्यात अनेक वर्षे मराठी विरुद्ध कोंकणी असा वाद सुरू आहे. १९८७ साली उफाळलेल्या वादावेळी काहींचे बळीही गेले. गोव्यात मराठी राजभाषा नको, अशी भूमिका ज्या कोंकणी लेखकांनी घेतली त्यात मावजो यांचाही समावेश होतो. यामुळेच मावजो यांना साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यास मराठी चळवळीतील काहींचा विरोध आहे.
मावजो म्हणाले, मला गोव्यातील मराठीवाद्यांपैकी सगळेच विरोध करत नाहीत. त्यांना कावीळ झालेली आहे. मला ते विरोध का करतात हेच कळत नाही. मी साहित्यातून कोंकणीची सेवा केली. मला कोंकणी लेखक या नात्याने संमेलनात बोलावले गेलेले नाही तर एक भारतीय भाषांमधील लेखक व ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला लेखक या नात्याने निमंत्रित केले आहे. यावेळी माझी निवड झाली, ती केवळ कोंकणी म्हणून नव्हे.
कथासंग्रहाला मराठी प्रस्तावना -
मावजो म्हणाले की, मला मराठीविषयी एवढा आदर आहे की, मी माझ्या कोंकणी कथासंग्रहात देखील मराठी प्रस्तावना छापलेली आहे. माझ्याकडे आलेली मराठीतील प्रस्तावना कोंकणीत अनुवादित करून छापू या असे प्रकाशकाने सुचविले होते. पण मी मराठीतच छापण्याचा निर्णय घेतला.
मी मराठी साहित्याचे जेवढे वाचन व अभ्यास केला आहे, त्याच्या दहा टक्केही गोव्यातील काही मराठीवाद्यांनी केलेला नाही. मी त्यांना आव्हान देतो, की त्यांनी दहा टक्के तरी अभ्यास व वाचन केले असल्याचे मला दाखवून द्यावे.
- दामोदर मावजो, ‘ज्ञानपीठ’प्राप्त साहित्यिक