...तेव्हा लाच द्यावी लागत नाही : मोदी
By किशोर कुबल | Published: February 7, 2024 07:59 AM2024-02-07T07:59:27+5:302024-02-07T08:00:41+5:30
योजनांमुळे लोकांमधील मतभेद दूर
किशोर कुबल
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : केंद्र सरकारच्या योजनांची राज्यांमध्ये पूर्णपणे अंमलबजावणी करणे हीच खरी धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले. ते म्हणाले, जेव्हा योजना तळागाळात पोहोचतात तेव्हा लोकांमधील मतभेद दूर होतात. प्रत्येक लाभार्थ्याला पूर्ण लाभ मिळतो. जेव्हा योजना पूर्णत्त्वास जाते तेव्हा लोकांना त्यांचे हक्क मिळवण्यासाठी लाच द्यावी लागत नाही.
‘२०४५ पर्यंत देशात ऊर्जावापर दुपटीने वाढेल. लवकरच भारत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर येईल, असा ठाम दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. केंद्रीय अर्थसंकल्पातील साधनसुविधांसाठीचा अधिकाधिक निधी वीजक्षेत्रासाठी खर्च केला जाईल, असे ते म्हणाले. मोदी गोवा भेटीवर आले असून बेतुल (दक्षिण गोवा) येथे राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. मोदी म्हणाले, ‘देशात दुचाकी व चारचाकींची विक्री वाढत असून विक्रम तोडले जात आहेत. इलेक्ट्रिकल वाहनांची मागणी वाढत आहे.
१३३० कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ‘विकसित भारत, विकसित गोवा २०४७’ कार्यक्रमांतर्गत १३३० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी झाली.
मोदी यांनी रोजगार मेळ्यांतर्गत विविध विभागांमधील १९३० नवीन सरकारी कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेशही वितरित केले. गोव्यात केंद्राच्या सर्व योजना राबविल्या जात आहेत, असे ते म्हणाले.