...तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; आम आदमी पक्षाकडून आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2024 10:21 AM2024-05-10T10:21:38+5:302024-05-10T10:23:09+5:30
भाजपकडून इंडिया आघाडीला कमी दाखविण्याचा हा प्रकार असून, इंडिया आघाडीचे नेते एकत्र असून, २०२७ विधानसभेच्या निवडणुकांची ही नांदी आहे, असे अमित पालेकर यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : मुख्यंमत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भाजपचे उमेदवार एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील, असा आत्मविश्वास आहे. जर यापेक्षा कमी मते मिळाली, तर मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा. भाजपकडून इंडिया आघाडीला कमी दाखविण्याचा हा प्रकार असून, इंडिया आघाडीचे नेते एकत्र असून, २०२७ विधानसभेच्या निवडणुकांची ही नांदी आहे, असे आम आदमी पक्षाचे समन्वय अॅड. अमित पालेकर यांनी गुरुवारी आम आदमी पक्षाच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी आपचे नेत वाल्मीकी नायक व इतर उपस्थित होते. अॅड. पालेकर म्हणाले, भाजप दक्षिण गोव्यात, तसेच उत्तर गोव्यातील उमेदवार जिंकणार नाही, याची भीती होती, म्हणून मुख्यमंत्र्यांनी दिवसरात्र झोपडपट्टी परिसरही प्रचारासाठी पिंजून काढला. यंदा त्यांना लोकांकडून जास्त मते मिळणार नाहीत, याची भीती होती, म्हणून खास दिल्लीतून मोठ्या नेत्यांना गोव्यात प्रचारासाठी बोलाविले होते.
आता जर मुख्यमंत्री दोन्ही उमेदवार बहुमतांनी जिंकणार असे बोलत आहेत. जर कमी मते पडली, तर याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. लोकांना फक्त धर्म जातीवर विभाजन करण्याचे काम हे भाजपने केले आहे. जाती- धर्माच्या नावाने त्यांनी मते मागितली आहेत.
आरजी भाजपचा घटक
आरजी ही फक्त भाजपची बी टीम नसून, तो भाजपचाच घटक आहे. त्यांनी फक्त मते विभाजन करण्याचा डाव रचला होता; पण यंदा अनेक लोकांना त्यांचा हा डाव कळल्याने त्यांना लोकांनी मतदान केले नाही. आपल्याकडे पैसे नाहीत, असे सांगणाऱ्या या पक्षाने निवडणूक कशी लढविली, हाही प्रश्न आहे. फक्त गोमंतकीयांची मते विभाजन करण्याचे काम आरजीने केले आहे, असा आरोपही अॅड. पालेकर यांनी केला आहे.