...तर गोव्यात ऑटो-टॅक्सी व्यवसायिकांसाठी महामंडळ स्थापन करू, अरविंद केजरीवाल यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 05:38 PM2021-11-17T17:38:02+5:302021-11-17T17:39:09+5:30
Arvind Kejriwal News: दक्षिण गोव्यात असलेल्या नवेवाडे, दाबोळी भागातील संतोषी माता मंदिराच्या सभागृहात टॅक्सी चालकांबरोबर संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी वरील घोषणा केल्या.
वास्को: भविष्यात गोव्यात आम आदमी पक्षाचे सरकार स्थापित झाल्यास गोव्यातील ऑटो आणि टॅक्सी व्यावसायिकांच्या हितासाठी महामंडळ स्थापित केले जाईल. भविष्यात टॅक्सी अथवा ऑटो चालकाला अपघात झाल्यास आमच्या सरकारकडून त्याचा मोफत उपाचार केला जाईल. टॅक्सी मीटरच्या विषयात उच्च न्यायालयाकडून आलेल्या आदेशाला आम्ही टॅक्सी चालकांच्या हीतासाठी पुढच्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात आवाहन देणार असल्याची माहीती दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरवींद केजरीवाल यांनी दिली.
बुधवारी दक्षिण गोव्यात असलेल्या नवेवाडे, दाबोळी भागातील संतोषी माता मंदिराच्या सभागृहात टॅक्सी चालकांबरोबर संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी वरील घोषणा केल्या. गोव्यातील राजकीय नेते आणी लोक टॅक्सी चालकांना ‘माफीया’ म्हणून बोलवत असल्याचे मला ऐकायला आल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. टॅक्सी बांधव जर माफीया असते तर त्यांचे आज मोठमोठे बंगले - गाड्या असत्या. ते मूळीच ‘माफीया’ नसून गोव्यात जर कोण माफीया आहेत तर ते येथील राजकीय नेते असल्याचे केजरीवाल म्हणाले. याच राजकीय नेत्यांनी मागील वर्षात खाण घोटाळा आणि अनेक विविध घोटाळे करून गोव्याला लुटले आहे. गोव्यातील टॅक्सी चालकांच्या विविध समस्या असून त्या सोडवण्यासाठी सरकार काहीच पावले उचलत नाहीत. तसेच टॅक्सी बांधवांना विश्वासात न घेता टॅक्सी व्यवसाय क्षेत्रात सरकारकडून विविध धोरणे तयार केली जातात ज्यांचा भविष्यात टॅक्सी बांधवांना त्रास सोसावा लागतो. भविष्यात गोव्यात आम आदमी पक्षाचे सरकार स्थापीत झाल्यास ऑटो आणि टॅक्सी चालकांच्या हीतासाठी विविध पावले उचलणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. ऑटो आणि टॅक्सी चालकांचे महामंडळ स्थापित करून त्याच्यावर फक्त दोन सरकारी अधिकारी नियुक्त केले जाईल. त्या महामंडळावरील राहीलेले सदस्य टॅक्सी चालकच असणार असून हे महामंडळ भविष्यात टॅक्सी व्यवसायासाठी विविध धोरणा, भाड्याचे शुल्क इत्यादी गोष्टी ठरवणार. तसेच कुठल्याही ऑटो - टॅक्सी चालकाला अपघात घडल्यास आम आदमी पक्षाचे सरकार स्थापित झाल्यास त्या चालकाचा मोफत उपचार करणार असल्याची माहीती केजरीवाल यांनी दिली.
पुन्हा पुन्हा टॅक्सी चालकांना वाहतूक विभागात फेर फटक्या माराव्या लागत असून टॅक्सीवाल्यांच्या हीतासाठी आम्ही भविष्यात सर्व सोपस्कार ‘ऑटोनलाईन’ पद्धतीने करणार. उच्च न्यायालयाचा टॅक्सी मीटरच्या विषयात आलेल्या आदेशाला आम्ही पुढच्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात आवाहन देणार आहोत. उच्च न्यायालयात सरकारने टॅक्सीवाल्यांची बाजू ठेवली नसल्याने अशा प्रकारचा आदेश आल्याचे मला कळाले असून टॅक्सी चालकांच्या हीतासाठी त्या आदेशाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आवाहन देणार आहोत. सात वर्षापूर्वी दिल्लीत ऑटो आणि टॅक्सी चालकांना अनेक समस्या होत्या व त्यांना कोणीही पाठींबा देत नव्हता. मी त्यांच्याबरोबर उभा राहील्यानंतर त्यांनी मला पूर्ण पाठींबा दिला असून दिल्लीत आप सरकार स्थापित होण्यामागे ऑटो आणि टॅक्सी व्यावसायिकांना ७० टक्के श्रेय जात असल्याचे केजरीवाल म्हणाले. दिल्लीतील टॅक्सी आणि ऑटो चालकांच्या सर्व समस्या मी दूर केल्या असून आज ते सुखी आहेत. कोरोनाच्या पहील्या आणि दुसºया लाटीनंतर आमच्या दिल्ली सरकारने तेथील प्रत्येक ऑटो आणि टॅक्सी चालकाच्या खात्यात दोन्हीवेळा पाच पाच हजार रुपये घातल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. गोव्यात २५ हजार टॅक्सी चालक असून त्यांच्या प्रत्येक कुटूंबाने एकत्रित येऊन ‘आप’ ला पाठींबा दिल्यास भविष्यात गोव्यात नक्कीच टॅक्सीवाल्यांचे सरकार स्थापित होणार असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला.
माझ्यानंतर दुस-या दिवशी ते करतात घोषणा: अरविंद केजरीवाल
जेव्हा जेव्हा मी गोव्यात येऊन कुठली घोषणा केली आहे त्याच्या दुस-या दिवशीच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घोषणा केली आहे. मी वीज बिल माफ करणार म्हणून घोषणा केल्यानंतर दुस-या दिवशी सावंत यांनी पाणी मोफत देण्याची घोषणा केली. अशा प्रकारे त्यांनी अन्य घोषणा केल्या असून उद्या टॅक्सीवाल्यांसाठी मुख्यमंत्री सावंत कदाचित घोषणा करतील असे केजरीवाल म्हणाले. त्यांच्याकडून केल्या जाणा-या घोषणांना बळी पडू नकात कारण निवडणूक जवळ आल्याने ते आता खोट्या घोषणा करत असल्याचे केजरीवाल म्हणाले.