राज्यातील पर्यटकांच्या संख्येत घट झालेली नाही - रोहन खंवटे
By समीर नाईक | Published: February 9, 2024 03:53 PM2024-02-09T15:53:27+5:302024-02-09T15:53:40+5:30
मंत्री मावीन गुदिन्हो यांनी ज्या बाबतीत पर्यटन मध्ये घट झाल्याचे सांगितले होते, त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला.
पणजी : राज्यातील पर्यटकांच्या संख्येत कुठेही घट झालेली नाही. डिसेंबर महिन्यात राज्यातील ५ स्टार, ४ स्टार व ३ स्टार हॉटेल्समध्ये ८० टक्के बुकिंग झाली होती. या व्यतिरिक्त इतर हॉटेल्स देखील फुल्ल होती, अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिली.
मंत्री मावीन गुदिन्हो यांनी ज्या बाबतीत पर्यटन मध्ये घट झाल्याचे सांगितले होते, त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. पर्यटन क्षेत्रातील त्रुटीमुळे काही पर्यटन रज्यापासून दूर होत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. विमान दर वाढले, काही सोशल इन्फ्लूएंसर करत असलेली राज्याची बदनामी, टॅक्सी किंवा हॉटेल व्यावसायीकामध्ये असलेले बेकायदेशीर दलाल, या त्रुटी दूर करण्यावर गुदिन्हो यांचा भर होता, असे खंवटे यांनी यावेळी सांगितले.
वरील त्रुटीपैकी काही राज्य सरकारच्या नियंत्रणाबाहेर आहे, त्यामुळे हे विषय केंद्राशी बोलून सोडविण्यात येईल. तसेच वाहतूक खाते आणि पर्यटन खाते एकत्रित काम करून राज्यातील पर्यटन संबंधित अनेक समस्या सोवण्यासाठी देखील कटिबध्द आहे. मुख्यमंत्र्यांशी देखील याबाबत चर्चा करण्यात येईल, असेही खंवटे यांनी अधिक माहिती देताना सांगितले.