श्रीपादभाऊंना डावलल्याची सर्वत्र भावना; राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाला PM मोदींसोबत रथावर स्थान न दिल्याने सूर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 11:24 AM2023-10-28T11:24:50+5:302023-10-28T11:27:03+5:30
पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमात कोणी कुठे बसावे आदी व्यवस्थेबाबत पंतप्रधान कार्यालयातूनच निर्णय घेतले जातात.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजीः राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फातोर्डा मैदानावर रथातून केलेल्या फेरीत केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना डावलल्याने सर्वत्र तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत.
भाजपने बहुजन समाजाच्या नेत्याला दूर ठेवल्याचा आरोप करत काँग्रेस, आप, तृणमूल आदी विरोधी पक्षांनीही टीकेची झोड उठविली आहे. गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वी मोदी यांनी मैदानावर रथातून फेरी मारत उपस्थितांना अभिवादन केले. यावेळी रथात त्यांच्यासोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे या दोघांनाच स्थान दिले. केंद्रात मंत्री असलेले उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांना यापासून दूर ठेवले. दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, तसेच राज्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनाही स्था घेतले नाही. यावरून आता सर्व थरांतून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. विरोधी पक्षांनीही हल्लाबोल केला.
प्रदेश काँग्रेसचे माध्यम विभागप्रमुख अमरनाथ पणजीकर म्हणाले की, गोव्यात एसटी समाजासाठी राजकीय आरक्षणावर भाजपचा खोटारडेपणा, पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात एससी-एसटी आणि ओबीसींना आरक्षण देण्यासाठी सरकारची दिरंगाई, तसेच भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नवीन संसद भवनाच्या पायाभरणी व उद्घाटनासाठी आमंत्रित न करणे या घटना लोक विसरलेले नाहीत. भाजप सरकार ख्रिस्ती आणि इतर अल्पसंख्याक समुदायांना नेहमीच सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसकडून टीकेची झोड
प्रदेश काँग्रेसचे माध्यम विभागप्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी टीकेची झोड उठविताना हा ओबीसी, अनुसूचित जमाती व ख्रिस्ती समाजाचा अपमान असल्याचे म्हटले आहे. श्रीपाद नाईक आणि फ्रान्सिस सार्दिन गोविंद गावडे यांना स्वयंपूर्णा फेरीतून मुद्दामहून वगळल्याची टीका पणजीकर यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेवरूनच मुख्यमंत्र्यांनी हे कृत्य केल्याचे पणजीकर यांचे म्हणणे आहे. गोव्याचे लोकसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन खासदारांना स्वयंपूर्णा फेरीत का समावून घेतले नाही. याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशी मागणी पणजीकर यांनी केली आहे.
बहुजन समाजाचा अनादर आप
भंडारी समाजाचे नेते केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना स्थावर स्थान न दिल्याने, आम आदमी पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते सिद्धेश भगत यांनी टीका केली आहे. श्रीपादभाऊ, तसेच दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन व क्रीडामंत्री गोविंद गावडे यांना डावलणे अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. श्रीपाद यांना डावलून भाजपने जुन्या नेत्यांप्रती त्यांना आदर नसल्याचे दाखवून दिले. भाजप कार्यकत्यांनी आता तरी सावध व्हावे. नेत्याला डावलले जाऊ शकते. तेथे कार्यकत्यांना काय किंमत मिळणार, असेही ते म्हणाले
तृणमूलकडूनही हल्लाबोल
तृणमूल कॉंग्रेसचे प्रदेश संयुक्त समन्वयक समील वळवईकर यांनी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात पाच वेळा निवडून आलेले व केंद्रात मंत्री असलेले श्रीपाद नाईक, तसेच राज्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांना का डावलले, पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन करायला आले होते की, राजकीय सभा संबोधित करायला? आदी सवाल केले आहेत.
पीएमओ कार्यालयाचाच निर्णय
भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमात कोणी कुठे बसावे आदी व्यवस्थेबाबत पंतप्रधान कार्यालयातूनच निर्णय घेतले जातात. या पलीकडे मी काही बोलू शकत नाही.
लोक बोलतात ते योग्य, पण...
केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की, माझ्याबद्दल भावना व्यक्त करताना लोक बोलतात, ते योग्यच, त्यांचे मी धन्यवाद मानतो, परंतु पंतप्रधानांच्या कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान कार्यालयच कोणी कुठे बसावे, कुठे वावरावे, याबाबत निर्णय घेत असते. मला यावर अधिक काही बोलायचे नाही.