तूर्त मंत्रिमंडळ फेररचना नाही! मुख्यमंत्री उद्या दिल्लीला, काही इच्छुक आमदारांचे 'गुड न्यूज'कडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2024 12:26 PM2024-06-20T12:26:01+5:302024-06-20T12:26:56+5:30

'लोकमत'ने कानोसा घेतला असता मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून खुद्द मुख्यमंत्री सध्या मंत्रिमंडळात कोणताही बदल करण्यास इच्छुक नाहीत.

there is no cabinet reshuffle at the moment in goa govt | तूर्त मंत्रिमंडळ फेररचना नाही! मुख्यमंत्री उद्या दिल्लीला, काही इच्छुक आमदारांचे 'गुड न्यूज'कडे लक्ष

तूर्त मंत्रिमंडळ फेररचना नाही! मुख्यमंत्री उद्या दिल्लीला, काही इच्छुक आमदारांचे 'गुड न्यूज'कडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: महाराष्ट्रात मंत्रिमंडळ बदलाचे वारे असल्याने गोव्यातही काही इच्छुक आमदार आशेवर आहेत. मुख्यमंत्री आज, २१ रोजी दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे दिल्लीतून काही 'गूड न्यूज' मिळेल का? याकडे या आमदारांचे लक्ष लागून राहिले आहे. 'लोकमत'ला प्राप्त माहितीनुसार, गोव्यात तूर्त मंत्रिमंडळ फेररचना केली जाण्याची शक्यता नाही.

मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यात केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव, भाजपचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेणार आहेत. या नेत्यांकडे ते वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतील. म्हादई, राखीव व्याघ्रक्षेत्र, वाळू उपशासाठी परवानगी आदी विषय केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांकडे पुन्हा एकदा मांडून मुख्यमंत्री या प्रश्नांवर पाठपुरावा करतील. नड्डा व बी. एल. संतोष यांचीही ते भेट घेणार असल्याने त्याबद्दल मात्र उत्कंठा आहे.

'लोकमत'ने कानोसा घेतला असता मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून खुद्द मुख्यमंत्री सध्या मंत्रिमंडळात कोणताही बदल करण्यास इच्छुक नाहीत. मंत्रिमंडळ फेररचनेचा तूर्त तरी कोणताही प्रस्ताव नाही. काही आमदारांची मात्र अशी भावना आहे की महाराष्ट्राबरोबरच गोव्यातही मंत्रिमंडळातून एक, दोघांना वगळून त्याजागी नवी वर्णी लागू शकते.

सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांना मतदारसंघातील सरपंच, पंच यांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांची भेट हा याचाच एक भाग आहे. आणखी काही आमदारांनीही सरपंच, पंच सदस्यांना पुढे काढण्याचा असाच प्रयत्न चालवला होता. परंतु मुख्यमंत्री काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने त्यांनी आता काहीशी माघार घेतली आहे.

'ते' अजूनही वंचित

दुसरीकडे सप्टेंबर २०२२ मध्ये काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये आलेले आमदारही मंत्रिपदाच्या आशेवर आहेत. या आमदारांपैकी सिक्वेरा यांना केवळ सासष्टीतील प्रतिनिधी म्हणून केवळ नशिबाने मंत्रिपद मिळाले. परंतु मडगावमध्ये आमदार दिगंबर कामत, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर अजून वंचित आहेत.

काब्रालांना पुन्हा संधी हवी

लोकसभा निवडणुकीत भाजपला सासष्टीतील अल्पसंख्याकांची मते मिळावीत यासाठी नुवेचे आमदार आलेक्स सिक्चेरा यांना मंत्रिपद देण्यात आले. परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. सिक्वेरा हे तीन हजारसुद्धा मते देऊ शकले नाहीत. सिक्चेरा यांच्यामुळे ज्यांचे मंत्रिपद गेले ते कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांना आपल्याला पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असे वाटते. मात्र सध्या मंत्रिमंडळ बदल होणार नाहीच.

 

Web Title: there is no cabinet reshuffle at the moment in goa govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.