पालिकेत नगरसेवकांसाठीच जागा नाही, आक्रमक होऊन दिपक नाईक यांनी उपस्थित केला प्रश्न
By पंकज शेट्ये | Published: October 16, 2023 09:32 PM2023-10-16T21:32:27+5:302023-10-16T21:35:24+5:30
लवकरच जागा उपलब्ध करून देण्याचे नगराध्यक्षाचे आश्वासन
वास्को: मुरगाव नगरपालिकेने बोलवलेल्या सर्व साधारण बैठकीत काही नगरसेवक आक्रमक होऊन त्यांनी विविध विषय उपस्थित केल्याचे सोमवारी (दि.१६) दिसून आले. दोन वर्षापासून मुरगावचे उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांनाच पालिकेत बसण्यासाठी खोली - जागा नसल्याचे नगरसेवक दिपक नाईक यांनी निदर्शनात आणून आम्हा नगरसेवकांना अशा प्रकारे हल्क्याने घेऊ नका अशी तंबी दिली. मुरगाव नगरपालिकेच्या इमारतीचे नुतनीकरण - सौदरीकरण काम पुढच्या दोन - तीन महीन्यात पूर्ण होणार असून त्यापूर्वी नगरसेवकांना पालिकेत योग्य जागा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे आश्वासन नगराध्यक्ष गीरीश बोरकर यांनी दिली.
सोमवारी बायणा रवींद्र भवनात मुरगाव नगरपालिकेची सर्वसाधारण बैठक बोलवली होती. त्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून काही ठरावही संमत करण्यात आले. बैठकीत काही विषय उपस्थित करताना नगरसेवक आक्रमक झाल्याचे दिसून आले. सुमारे दोन वर्षापासून मुरगाव नगरपालिकेच्या इमारतीचे नुतनीकरण - सौंदरीकरण काम चालू आहे. दोन वर्षापासून मुरगाव पालिकेच्या उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांना बसण्यासाठी पालिका इमारतीत खोली - जागा नसल्याने नगरसेवक दिपक नाईक यांनी आक्रमक होत तो विषय वर काढला. मुरगाव नगरपालिकेत तीन पालिका अभियंता असून तिघांनाही स्वतंत्र खोली (कार्यालय) असल्याचे नाईक यांनी सांगून आमच्या उपनगराध्यक्षांना खोली का दिलेली नाही असा सवाल उपस्थित केला. तसेच इतर नगरसेवकांना बसण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने अनेकवेळा नगरसेवकांना नगराध्यक्षांच्या खोलीत बसावे लागत आहे.
नगरसेवकांची मुरगाव नगरपालिकेच्या इमारतीत लावारीसांसारखी अवस्था झाल्याने काही नगरसेवक पालिकेतसुद्धा येत नसल्याचे नाईक म्हणाले. आम्हा नगरसेवकांना अशा प्रकारे हलक्याने घेऊ नकात अशी तंबी त्यांनी दिली. मुरगाव नगरपालिकेच्या इमारतीच्या नुतनीकरण - सौंदरीकरण काम पुढच्या दोन तीन महीन्यात पूर्ण होणार आहे. त्यापूर्वीच नगरसेवकांना बसण्यासाठी पालिकेत योग्य जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन नगराध्यक्ष गीरीश बोरकर यांनी दिले. वास्कोत असलेल्या ‘देव दामोदर ट्रस्ट’ च्या जागेत उत्तम सभागृह प्रकल्प उभारण्यासाठी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी पालिकेकडून ना हरकत दाखला मागितला होता. तसेच भूमिगत वीज वाहीन्या प्रकल्पासाठी ना हरकत दाखला आमदारांनी मागितला होता. दोन्ही ना हरकत दाखले देण्याचा प्रस्ताव पालिकेने घेतला. सुमारे एका वर्षापूर्वी आणि त्या अघोधरसुद्धा मुरगाव नगरपालिकेच्या कचरा विल्हेवाट प्रकल्पात मोठी आग लागून लोकांना बराच त्रास झाला होता. ती आग कशामुळे लागली त्याचे कारण उघड झाले नव्हेत. सुरक्षेच्या दृष्टीने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कचरा विल्हेवाट प्रकल्पात ‘सीसीटीव्ही कॅमेरा’ बसवण्याबाबतचा विषय बैठकीत चर्चेत आला.
त्यावेळी नगरसेवक दामोदर नाईक आणि अन्य काही नगरसेवकांनी कचरा विल्हेवाट प्रकल्पात सीसीटीव्ही कॅमेरा बसवाच, मात्र त्याबरोबरच ज्या ठीकाणी अज्ञात लोक पुन्हा पुन्हा कचरा टाकतात (ब्लॅक स्पोट) तेथे सीसीटीव्ही कॅमेरा बसवा अशी मागणी बैठकीत केली. ‘ब्लॅक स्पोट’ च्या ठीकाणी पुन्हा पुन्हा स्वच्छता करून सुद्धा तेथे लोकांकडून कचरा टाकण्यात येत असून कॅमेरा बसवल्यास कोण कचरा टाकतो ते उघड होऊन त्याच्यावर योग्य कारवाई करण्यासाठी मदत मिळेल असे नगरसेवक अमेय चोपडेकर आणि अन्य काही नगरसेवकांनी सांगितले. ‘ब्लॅक स्पोट’ च्या जागेत सीसीटीव्ही बसवण्याबाबतचा यापूर्वीच्या बैठकीत ठराव घेतला असून त्याबाबत उचित पावले उचलवावी असे चोपडेकर यांनी सांगितले. अनेक वर्षापासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना कायमस्वरुपी घेणे आणि अन्य विषयांवरही बैठकीत चर्चा झाली.