राज्यात पेट्रोलटंचाई नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 01:06 PM2023-12-09T13:06:27+5:302023-12-09T13:07:12+5:30
प्राथमिक अहवाल मिळाला त्यानुसार कंपनीला कडक इशारा देणारे पत्र पाठवले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : माटवे-दाबोळी येथे पेट्रोल गळती प्रकरणात प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून ही गळती नैसर्गिक असल्याचे आढळून आले आहे. संबंधित पेट्रोलियम कंपनीवर कारवाई केली जाईल. तूर्त पेट्रोलची कोणतीही टंचाई नसल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत बोलताना एका प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतलेली आहे. असले प्रकार मुळीच खपवून घेतले जाणार नाहीत. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच दक्षिण जिल्हाधिकारी कार्यालय करडी नजर ठेवून आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे. प्राथमिक अहवाल मिळाला त्यानुसार कंपनीला कडक इशारा देणारे पत्र पाठवले आहे.
संबंधित पेट्रोलवाहिनी बराच काळ विनावापर होती. सरकारने कंपनीला ती बदलण्यास सांगितले आहे. या कामासाठी महिनाभर जाईल. वाहिनी बदलल्यानंतरच पेट्रोलसाठी वापरली जाईल. दरम्यान, पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली असून राज्यात पेट्रोलची मुळीच टंचाई नसल्याचे सावंत यांनी सांगितले.
विश्वकर्मा : १४ हजार जणांची नोंद
केंद्राच्या विश्वकर्मा योजनेत राज्यभरात १४ हजार जणांनी नोंदणी केली असून २० हजार नोंदणी अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. व्यापार, व्यवसाय करणाऱ्या १८ प्रकारच्या व्यावसायिकांना याचा लाभ दिला जातो. ही योजना जातीवर आधारित नव्हे, काहीजणांनी गैरसमज करुन घेतला आहे तो दूर करावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.