चौकशीला यायला वेळ नाही; व्यस्त असल्याचा पूजा शर्माचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2024 01:34 PM2024-07-01T13:34:27+5:302024-07-01T13:35:10+5:30
तारीख बदलण्याची मागणी, आसगाव ग्रामसभेत पडसाद
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: आसगाव येथील घराच्या तोडफोड प्रकरणात मुख्य संशयित असलेली पूजा शर्मा हिला पोलिसांनी आज, १ जुलै रोजी चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले असले, तरी त्यादिवशी आपण व्यस्त असल्यामुळे वेळ बदलून देण्याची मागणी तिने केली आहे.
आसगाव येथील घर मोडतोड प्रकरण हाणजूण पोलिसांकडून क्राइम बॅचला सोपविण्यात आल्यानंतर या प्रकरणातील तपासाने वेग घेतला आहे. क्राइम ब्रँचकडून या प्रकरणात विशेष तपास पथकही (एसआयटी) बनवले आहे. एसआयटीने पूजा शर्मा हिला आज चौकशीस उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले. मात्र या प्रकरणात तिने पोलिसांना दिलेल्या पत्रात चौकशीची ही वेळ बदलून देण्याची मागणी केली आहे. एक जुलै रोजी आपण इतर कामात व्यस्त आहे, असे तिने एसआयटीला कळवले आहे. दुसरी कोणतीही तारीख द्यावी, अशी मागणी तिने एसआयटीकडे केली आहे. पूजा ही या प्रकरणातील मुख्य संशयित आहे. तिच्याच सूचनेवरून बाऊन्सरने ते वादग्रस्त घर पाडले होते. आता तिच्या मागणीनुसार पोलिस तिला तारीख बदलून देणार का? की कारवाई करणार याची उत्सुकता आहे.
त्या बाउन्सरच्या अनेक भानगडी
पूजा शर्मा यांच्या अटक करण्यात आलेल्या कथित बाऊन्सरच्या एक नव्हे तर अनेक भानगडी असल्याचे आता उघड होत आहे. बाऊन्सर महम्मद इम्रान याच्या आसगाव येथे केलेल्या गुंडगिरीबरोबरच त्याला वाहनाच्या क्रमांक पट्टया व चेसिस क्रमांकही बदलण्याचे कारनामे उघड झाले आहेत. क्राईम ब्रँचने त्याच्यावर अशाच एका प्रकरणात नव्याने गुन्हा नोंदविला आहे.
आसगाव ग्रामसभेत पडसाद
आसगाव ग्रामसभेत घर पाडणे आणि वादग्रस्त क्लबच्या विषयाचे पडसाद रविवारी उमटले. ग्रामस्थांनी पंचायतीवर जोरदार टीका केली. ग्रामस्थ केदार कामत यांनी आगरवाडेकर प्रकरणातील फसवणूक आणि राजकारणाबद्दल चिंता व्यक्त केली. आगरवाडेकर यांना बेकायदेशीरपणे घर क्रमांक वाटप केल्याप्रकरणी पंचायत दोषी असल्याचे त्यांनी सांगितले, वादग्रस्त क्लब उभारणी आणि आगरवाडेकर प्रकरणामुळे गावच्या प्रतिष्ठेला धक्का बसत असल्याचे सांगत पंचायतीने या विषयात कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. गावातील बेकायदेशीर गोष्टी ग्रामपंचायतीच्या छुप्या पाठिंब्यामुळेच घडतात असा आरोप ग्रामस्थांनी केला. दरम्यान, सरपंच हनुमंत नाईक यांनी मात्र, सध्या सुरू असलेल्या तपासाचा हवाला देत घर पाडण्याच्या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला.