माध्यमप्रश्नी चर्चा नाही : पार्सेकर
By admin | Published: June 15, 2016 01:42 AM2016-06-15T01:42:50+5:302016-06-15T01:43:24+5:30
पणजी : राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी भाजपच्या राष्ट्रीय कार्र्यकारिणी बैठकीतही चर्चा झाली नाही व आपल्याला
पणजी : राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी भाजपच्या राष्ट्रीय कार्र्यकारिणी बैठकीतही चर्चा झाली नाही व आपल्याला दिल्ली भेटीवेळी पंतप्रधानांनीही त्याविषयी काही विचारले नाही, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
मुख्यमंत्री पार्सेकर म्हणाले, की भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांच्या आगामी निवडणुकीविषयी चर्चा झाली. या बैठकीत गोव्याचाही उल्लेख आला. गोव्यातील प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी भारतीय भाषा सुरक्षा मंच आंदोलन करत असले तरी, त्याविषयीची या बैठकीत चर्चा झाली नाही. कदाचित तो विषय गंभीरपणे घेतला गेला नसावा. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी सकाळी दिल्लीत भेटलो. त्यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाली; पण माध्यमप्रश्नी आपल्याला पंतप्रधानांनी विचारले नाही.
मुख्यमंत्री म्हणाले, की माध्यमप्रश्नी पंतप्रधानांच्या कार्यालयास कुणीतरी पत्र लिहिल्यानंतर पंतप्रधानांच्या कार्यालयातून त्याविषयी स्पष्टीकरण मागण्यात आल्याचे आपण ऐकले; पण आपल्यापर्यंत तरी तसे पत्र पंतप्रधानांच्या कार्यालयातून आलेले नाही. एरव्ही कुणीही कोणत्याही समस्येबाबत पत्र लिहिल्यानंतर त्या पत्राविषयी तीन आठवड्यांत किंवा महिन्याभरात तुमचे मत कळवा, असे राज्याला सांगितले जातेच. त्यात काही नावीन्य नाही. (खास प्रतिनिधी)