एक होती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
By admin | Published: September 20, 2014 01:20 AM2014-09-20T01:20:49+5:302014-09-20T01:20:49+5:30
राज्यातील वास्तव : भाजप विद्यार्थी प्रकोष्ठचे विद्यापीठावर वर्चस्व
वासुदेव पागी-पणजी : राज्यात ‘विद्यार्थी चळवळ’ :हा विषय आला की, एक नाव न चुकता प्रामुख्याने घ्यावे लागेल ते म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. काही दशके आंदोलने आणि चळवळींनी इतिहास बनविलेल्या या संघटनेचे नाव आजच्या घटकेला निदान गोवा विद्यापीठाच्या क्षितिजावरून तरी नाहीसे झाले आहे.
राष्ट्रीयत्व ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा घेऊन विद्यार्थी क्षेत्रात सक्रिय असलेल्या ‘अभाविप’ने १९९० ते २००८ या काळात राज्यभर दबदबा निर्माण केला होता. गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीत कित्येक वेळा या संघटनेचा झेंडा फडकला होता. अशा या संघटनेचा आज राज्यातील एकाही महाविद्यालयात विद्यापीठ प्रतिनिधी नाही, ही वस्तुस्थिती आहे. हल्लीच झालेल्या ‘अभाविप’च्या गोव्यातील पीछेहाटीचे कारण विचारले असता, ‘अभाविप’चे एकेकाळी प्रदेशमंत्री म्हणून जबाबदारी असलेले लालजी पागी यांनी सांगितले की, संघटना पूर्वीसारखी गोव्यात सक्रिय नाही हे खरे आहे; परंतु त्यामुळे संघटनेचे काम थांबले, असे म्हणता येणार नाही. संघटनेचे काम सुरू असल्याचे ते सांगतात. केवळ विद्यापीठ निवडणुका हे संघटनेचे एकमेव उद्दिष्ट कधीच नव्हते.
परिषदेच्या कामासाठी गोव्यात येणारे प्रचारक येणे बंद झाल्यामुळे कामाला मरगळ आल्याची प्रतिक्रिया परिषदेच्या एका पूर्वीच्या कार्यकर्त्याने व्यक्त केली. परिषदेच्या कामासाठी महाराष्ट्रातून पूर्णवेळ प्रचारक यायचे. अभय भिडे, आशिष भावे, मिलिंद आरोलकर, रत्नप्रभा राहाटे हे गोव्यात पूर्णवेळ काम केलेले प्रचारक. त्याचप्रमाणे गोव्यातून गोव्याबाहेरही प्रचारक जात होते.
प्रचारकांचा ओघ थांबल्यामुळे कार्यकर्त्यांची नवीन फळी तयार झाली नाही. त्यामुळे जुने कार्यकर्ते आपापल्या व्यवसायात स्थिरावल्यानंतर कामही मंदावले. याचाच फायदा घेऊन भाजपमध्ये सक्रिय असलेले युवकांचे गट पुढे सरसावले आणि त्यांनी भाजप विद्यार्थी विभाग स्थापन करून त्याखाली विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकाही लढल्या. आज या गटाचे विद्यापीठावर वर्चस्व आहे.
भाजपच्या विद्यार्थी विभागाने विद्यापीठावर वर्चस्व प्रस्थापित केले असले, तरी त्यांच्या कार्याचा आवाका हा एखादा अपवाद वगळता विद्यापीठ निवडणुकांच्या सीमा ओलांडणारा नाही. ‘अभाविप’ ही निवडणुका लढविण्याबरोबरच राष्ट्रीय आणि स्थानिक मुद्दे घेऊन आंदोलने करत होती. तसेच विद्यार्थ्यांशी संबंधित उपक्रम वर्षभर चालू असायचे. त्यामुळे ‘आताचा भाजप विद्यार्थी प्रकोष्ठ म्हणजे अभाविप,’ असा समज करून घेऊ नका, असा टोलाही एका जुन्या कार्यकर्त्याने हाणला.
१९९१ आणि १९९२ अशी सलग दोन वर्षे अभाविपचे प्रदेशमंत्री म्हणून जबाबदारी पाहिलेले तसेच गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम केलेले कामगार नेते अजितसिंग राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना विद्यार्थी चळवळी आता राहिलेल्या नाहीत, असे सांगितले. ते म्हणाले, ‘आमच्या वेळी माझ्यासह माझ्याबरोबरच्या त्या वेळच्या कार्यकर्त्यांनी अगदी निष्ठापूर्वक आणि एक विचार घेऊन अभाविपचे काम केले होते. आज भाजप गोव्यातील सत्तास्थानी पोहोचलेला प्रबळ पक्ष असला, तरी त्या वेळी परिषद भाजपपेक्षा प्रबळ होती. आता भाजप विद्यार्थी प्रकोष्ठ म्हणून एक गट पुढे आला आहे. थेट एखाद्या राजकीय पक्षाचेच अंग बनून एखादी संघटना काम करते, तेव्हा ती सर्वसमावेशक बनू शकत नाही. शिवाय विद्यार्थी चळवळीत असताना केवळ विद्यार्थीहित, समाजहित आणि राष्ट्रहित या गोष्टीच पाहिल्या पाहिजेत. राजकीय आकांक्षांसाठी विद्यार्थी चळवळ हे प्राथमिक व्यासपीठ म्हणून वापरता कामा नये.’