पवारसाहेब, तुमच्याकडून अपेक्षा नव्हती, उत्पल पर्रिकरांचे जाहीर पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 07:31 PM2019-04-15T19:31:58+5:302019-04-15T20:05:38+5:30
माझे वडील मनोहर पर्रिकर यांच्याविषयीचे आपले विधान वाचून मला आणि माझ्या कटुंबाला अपार दुःख झाले. राजकीय फायद्यासाठी धादांत असत्य पसरविण्याच्या इराद्याने माझ्या वडिलांचे नाव वापरण्याचा हा आणखी एक दुर्दैवी आणि असंवेदनशील प्रयत्न आहे
पणजी - माझे वडील मनोहर पर्रिकर आज हयात नसताना त्यांचे नाव घेऊन खोटे बोलण्याचे स्वातंत्र्य घेत आहात. एक ज्येष्ठ आणि सन्मानित राजकारणी म्हणून भारतातल्या जनतेला पवार साहेबांकडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती, अशा शब्दात माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल यांनी एका पत्रात आपले दुःख व्यक्त केले आहे.
उत्पल मनोहर पर्रिकर यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून आपल्या वेदना जाहीर केल्या. त्यांनी पत्रात म्हटले आहे, “माझे वडील मनोहर पर्रिकर यांच्याविषयीचे आपले विधान वाचून मला आणि माझ्या कटुंबाला अपार दुःख झाले. राजकीय फायद्यासाठी धादांत असत्य पसरविण्याच्या इराद्याने माझ्या वडिलांचे नाव वापरण्याचा हा आणखी एक दुर्दैवी आणि असंवेदनशील प्रयत्न आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच कोल्हापुर येथे पत्रकारांशी बोलताना राफेलप्रश्नी बोलताना मनोहर पर्रिकर यांच्या नावाचा उल्लेख केला होता व राफेल करार पर्रिकर यांना पसंत नव्हता व त्यामुळे ते संरक्षण मंत्रीपद सोडून गोव्यात परतले होते, असा दावा शरद पवार यांनी केला होता. पवारांच्या विधानाच्या बातम्या देशभर झळकल्या. या पार्श्वभूमीवर उत्पल पर्रिकरांनी शरद पवार यांना पत्र पाठवलं आहे.
Former Goa CM Manohar Parrikar's son Utpal Parrikar writes to NCP's Sharad Pawar over his remark on Manohar Parrikar, states, "This is yet another unfortunate attempt to invoke my father's name to push blatant falsehoods for political gains. Urge you to desist from such conduct." pic.twitter.com/7fH68VOZur
— ANI (@ANI) April 15, 2019
माझे वडील स्वर्गीय मनोहर पर्रिकर यांनी देशाचे संरक्षण मंत्री म्हणून काम करताना अनेक महत्त्वाचे व चांगले निर्णय घेतले. राफेल लढाऊ विमान खरेदीच्या करारामध्येही पर्रिकर हे सुद्धा एक मुख्य शिल्पकार होते, अशी माहिती उत्पल पर्रिकर यांनी शरद पवारांना पत्रातून दिली आहे.
उत्पल पर्रिकर यांनी पत्रात पुढे नमूद केले आहे की, एक माजी संरक्षणमंत्री म्हणून आपल्या शूर सैनिकांना शस्त्रसज्ज करण्याचे किती महत्त्व आहे, हे आपण जाणत असाल याची मला खात्री आहे. आपल्या सशस्त्र दलांना बळकटी देण्याच्या प्रयत्नात अडथळा आणण्यासाठी खोडसाळ अपप्रचार मोहीम सुरू असून आपणही त्याचे भाग झालात, हे क्लेषकारक आहे असं उत्पल यांनी सांगितले आहेत.
तसेच “राफेल खरेदी व्यवहारामुळे मनोहर पर्रिकर संरक्षणमंत्रीपद सोडून गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून परतले असे खोटारडेपणाने सुचविणे हा मनोहर पर्रिकर व गोव्याच्या जनतेचा अपमान आहे. माझे वडील आजाराचा सामना करत असताना ज्यांनी चौकशी करायचीही तसदी घेतली नाही त्यांनी राजकीय चिखलफेकीसाठी त्यांचे नाव घेण्यास सुरुवात करावी हे दुःखदायक असल्याची खंत उत्पल यांनी व्यक्त केली. याचसोबत आपण अशा वक्तव्यांपासून दूर रहावे आणि मनोहर पर्रिकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या गोवा आणि भारतातील जनतेला शांतपणे त्यांच्या निधनाबद्दल शोक करू दे, असे कळकळीचे आवाहन उत्पल पर्रिकर यांनी शरद पवार यांना केले आहे.