किनारपट्टी स्वच्छतेत भ्रष्टाचार होणार नाही - आजगावकर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 06:15 PM2019-07-17T18:15:50+5:302019-07-17T18:18:43+5:30

किनारपट्टी स्वच्छतेच्या कामाबाबत कोणतीच अंदाधुंदी होणार नाही आणि भ्रष्ट व्यवहारही होणार नाही, असे पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले आहे.

There will be no corruption in coastal cleanliness - Ajgaonkar | किनारपट्टी स्वच्छतेत भ्रष्टाचार होणार नाही - आजगावकर

किनारपट्टी स्वच्छतेत भ्रष्टाचार होणार नाही - आजगावकर

पणजी - किनारपट्टी स्वच्छतेच्या कामाबाबत कोणतीच अंदाधुंदी होणार नाही आणि भ्रष्ट व्यवहारही होणार नाही, असे पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी बुधवारी (17 जुलै) विधानसभेत सांगितले आहे.

किनारपट्टी स्वच्छतेच्या कामासाठी निविदा जारी केली गेली आहे. समुद्रकिनारी हे पर्यटन खात्याच्या अखत्यारित येतात. त्यामुळे किनारे स्वच्छ करण्याचे काम पर्यटन खातेच करून घेईल. यापूर्वीच्या काळात किनारपट्टी स्वच्छतेच्या कंत्रटाचा विषय खूप गाजलेला आहे. आपल्याला त्याविषयीची सगळी कल्पना आहे. आमचा व्यवहार मात्र पारदर्शक असेल, असे मंत्री बाबू आजगावकर यांनी स्पष्ट केले आहे.

प्रश्नोत्तराच्या तासावेळी काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स तसेच फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. सरकारने घन कचरा व्यवस्थापन खातेही स्थापन केले आहे. त्यासाठी स्वतंत्र मंत्रीही आहे. आता किनारपट्टी स्वच्छतेचे काम पर्यटन खाते की ते घन कचरा व्यवस्थापन खाते करील अशी विचारणा सरदेसाई यांनी केली. एकाच कामासाठी दोन-तीन यंत्रणा सरकार स्थापन करते की काय असाही प्रश्न सरदेसाई यांनी केला. पर्यटन खाते अस्तित्वात असताना पर्यटन विकास महामंडळही आहे व महामंडळाचे काम सुरू असतानाच सरकार राज्य पर्यटन प्रोत्साहन मंडळ स्थापन करणार असल्याचे सांगते. सरकारला एकाच कामासाठी आणखी  किती मंडळे हवी आहेत अशी विचारणा विजय सरदेसाई यांनी केली आहे. 

केपीएमजीची चौकशी करा 

पर्यटन मास्टर प्लॅनचा मसुदा तयार करताना केपीएमजी या सल्लागार कंपनीने फक्त कॉपी-पेस्ट करण्याचेच काम केले आहे आणि या कामासाठी सरकारने अगोदरच केपीएमजीला तीन कोटी रुपये फेडले असल्याचे भाजपाचे आमदार ग्लेन टीकलो म्हणाले होते. तोच धागा पकडून विजय सरदेसाई यांनी हा गंभीर विषय असल्याचे सांगितले व या तीन कोटी प्रकरणी चौकशी केली जावी, अशी मागणी केली आहे. केपीएमजी काहीही करील व आम्ही गप्प राहू असे घडणार नाही, आम्ही दखल घेऊ, असे मंत्री आजगावकर यांनी नमूद केले आहे. 

 

Web Title: There will be no corruption in coastal cleanliness - Ajgaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.