गोव्यात पर्यटकांना लुबाडऱ्यांची गय नाही, मुख्यमंत्री प्रमोद सावंत कडाडले
By किशोर कुबल | Published: December 19, 2022 03:37 PM2022-12-19T15:37:30+5:302022-12-19T15:38:21+5:30
मुक्तीदिनानिमित्त ताळगांव येथे गोवा विद्यापीठ मैदानावर आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात सावंत बोलत होते.
पणजी : गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची लुबाडणूक करणाऱ्यांची मुळीच गय केली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला आहे. ‘पाहुण्यांना उत्तम प्रकारची वाहतूक सेवा टॅक्सी व्यावसायिक तसेच टूर आॅपरेटर्सनी सरकारला सहकार्य करावे. टॅक्सीभाड्यापासून विमान भाड्यापर्यंत सर्वच गोष्टींवर नियंत्रण हवे. टॅक्सीवाल्यांची कोणतीही बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही,’ असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावले.
मुक्तीदिनानिमित्त ताळगांव येथे गोवा विद्यापीठ मैदानावर आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात सावंत बोलत होते. याप्रसंगी सभापती रमेश तवडकर, महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात, विरोधी पक्षनेते युरी आलेमांव, हायकोर्ट न्यायाधीश व इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
मुरगांव बंदरात गेल्याच आठवड्यात अमेरिकन पर्यटकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न झाला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वरील इशारा दिला. ते म्हणाले की,‘ टॅक्सीभाड्यापासून विमान भाड्यापर्यत सर्वच गोष्टींवर नियंत्रण यायला हवे. गोव्याला नंबर वन पर्यटनस्थळ अशी प्रतिमा कायम राखायची असेल तर हे आवश्यक आहे. पर्यटकांची लूट थांबायला हवी.’
मुख्यमंत्री म्हणाले की,‘ गोव्याची पर्यटनाबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी तसेच किनाऱ्यांबरोबरच राज्याच्या अंतर्गत भागातील पर्यटन (हिंटरलँड टुरिझम), इको-टुरिझम, वेलनेस टुरिझम, आध्यात्मिक पर्यटन यांसारख्या पर्यटनाच्या विविध पैलूंसाठी सरकार प्रयत्नरत आहे.’
राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून शुभेच्छा
राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनीही मुक्तिदिनानिमित्त गोमंतकीय जनतेला शुभेच्छा देताना पोर्तुगीजांच्या जोखडातून गोवा मुक्त करण्यासाठी लढा दिलेले स्वातंत्र्यसैनिक तसेच भारतीय सैन्यदलाचे स्मरण केले आहे. या सर्वांना सलाम, असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा मुक्तिदिनानिमित्त गोमंतकीय जनतेला शुभेच्छा दिल्या असून गोवा मुक्तीलढ्यासाठी योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिक, हुतात्म्यांचे स्मरण केले आहे. ‘या सर्वांचे योगदान स्फूर्तीदायी आहे. त्यांच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन गोव्याच्या विकासासाठी आम्ही कार्यरत आहोत,’असे मोदीजींनी म्हटले आहे.