पोलिसांच्या 'हनीट्रॅप' मध्ये फसला चोरटा; डॉक्टरच्या बंगल्यातील ४५ लाखांच्या चोरीचा पर्दाफाश 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 10:17 AM2023-08-26T10:17:29+5:302023-08-26T10:17:48+5:30

दोनापावलमध्ये सायकलवरून फिरला

thief caught in police honey trap 45 lakh theft from doctor bungalow exposed | पोलिसांच्या 'हनीट्रॅप' मध्ये फसला चोरटा; डॉक्टरच्या बंगल्यातील ४५ लाखांच्या चोरीचा पर्दाफाश 

पोलिसांच्या 'हनीट्रॅप' मध्ये फसला चोरटा; डॉक्टरच्या बंगल्यातील ४५ लाखांच्या चोरीचा पर्दाफाश 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : दोनापावला येथील डॉ. संजय खोपे यांच्या बंगल्यातून तब्बल ४५ लाख रुपयांचा ऐवज घेऊन पसार झालेल्या चोराच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलिसांनी टाकलेल्या हनी ट्रॅपच्या जाळ्यात संशयित सुरेदर छेत्री (वय ३१. मूळ नेपाळ) हा अडकला असून पश्चिम बंगालमधून अटक केली आहे. काल त्याला न्यायालयासमोर उभे केले असता आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

चोरीची घटना ३१ जुलै रोजी घडली होती. डॉ. खोपे यांचे कुटुंब झोपेत असताना मध्यरात्री छेत्री याने बंगल्या प्रवेश करून ४० लाख रुपयांचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिने तसेच ५ लाख रुपये रोख असा ४५ लाखांचा ऐवज लंपास केला, यापैकी २० लाखांचे वितळवलेले सोने पोलिसांनी मालाड- मुंबई येथून जप्त केल्याची माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वालसान यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छेत्री हा एका कापड्याने चेहरा झाकून सायकलवरून फिरत व आलिशान घरांची रेकी करायचा. यात तो बंद असलेल्या घरांची माहिती घ्यायचा. डॉ. खोपे यांच्या बंगल्याचीही त्याने रेकी केल्याचे तपासात समोर आले आहे. मध्यरात्री खोपे कुटुंब झोपलेले असताना छेत्री याने बंगल्यात प्रवेश करून तब्बल ४५ लाखांचा ऐवज लंपास केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. घटनेच्या तपासावेळी पोलिसांनी या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पडताळण्यास सुरुवात केली. त्यावेळी एकाच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. पोलिसांनी सीसीटीव्हीत दिसणाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली असता सायकलवरून फिरणारी व्यक्ती वारंवार कॅसिनोमध्ये जात असल्याचे दिसले. त्यानुसार चौकशीसाठी पोलिस कॅसिनोत पोहोचले. छेत्री याने कॅसिनोत एन्ट्री करताना प्रत्येकवेळी वेगवेगळे मोबाईल नंबर नोंद केले होते.

पोलिसांनी एकापाठोपाठ एक अशा सर्व क्रमांकाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, हे क्रमांक बनावट असल्याचे समोर आले. त्यातच एक क्रमांक छेत्रीच्या इन्स्टाग्रामशी जोडलेला आढळून आला आणि इथेच तो फसला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने तंत्रज्ञानाचा वापर करून त्याला अटक केली. दरम्यान, ही कारवाई पणजी उपअधीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पणजी पालिस निरीक्षक निखील पालयेकर व पोलिस उपनिरीक्षक संकेत पोखरे यांच्या पथकाने केली.

कॅसिनोत उधळायचा पैसे

सुरेदर चोरी केल्यानंतर ऐवज घेऊन थेट मलाइ मुंबई येथे पोहोचला. तिथे त्याने दागिने एका सोनाराला विकले व त्याच्याकडून मिळालेले पैसे घेऊन तो पुन्हा गोव्यात आला. हे पैसे घेऊन तो कॅसिनोत जायचा आणि त्याची हीच सवय त्याला नडली. छेत्री एकटाच चोरी करायचा. यात त्याचा अन्य कुठलाही साथीदार नसल्याचे अधीक्षक वालसान यांनी सांगितले.

प्रचंड दारू प्याला

कॅसिनोमध्ये गेल्यानंतर चोरटा तिथे प्रचंड दारूही प्याला. हातात पाच लाखांची रोख रक्कम असल्याने चोरटा अत्यंत महागडी दारू प्यायला. मद्याचे बिल ५० ते ६० हजार रुपये झाले. पोलिसांनी बिलही जप्त केले आहे. बाकीचे पैसे त्याने कसिनोमध्ये जुगार खेळण्यात उधळले. शेवटी प्रचंड पिऊन तो बाहेर मस्तीही करू लागला. कसिनोच्या कर्मचाऱ्यांकडून पोलिसांना तशी माहिती मिळाली. हा चोर आहे हे तोपर्यंत कुणाला ठाऊक नव्हते. चोरीच्या दागिन्यात काही डायमंड होते. बेकायदा ते कोणी विकत घेत नसल्याने चोरट्याने ते घण घालून फोडले.

सोनारांना विकला माल

दोनापावला येथे चोरी केल्यानंतर संशयित सुरेदर छेत्री यांनी मालाड मुंबई येथील एका सोनाराला तसेच अन्य काही जणांना चोरीचा काही माल विकला होता. सदर माल पोलिसांनी संबंधितांकडून जप्त केला आहे. २०१५ साली एका चोरी प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याला अटकही केली होती. 

चोरटा होता म्हापशाच्या हॉटेलमध्ये

डॉ. खोपे यांच्या घरी पहाटे तीन वाजता चोरी केल्यानंतर चोरटा पर्वरीच्या कॅसिनोमध्ये गेला. तिथून सकाळी तो म्हापशाला गेला व तेथील एका हॉटेलमध्ये थांबला होता. हॉटेलमध्ये त्याने आपले ओळखपत्र दिले होते. खोली भाड्याचे जेवढे बील झाले, त्यापैकी जास्त पैसे त्याने हॉटेल व्यवसायिकाला दिले होते, त्यामुळे व्यवसायिकाने त्याला पुन्हा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी फोन केला व तू जास्त दिलेले पैसे परत नेण्यासाठी ये, असा सल्ला दिला. तोपर्यंत हा चोर आहे हे हॉटेल मालकालाही ठाऊक नव्हते. पोलिसांनी कॉल डिटेल्स तपासले तेव्हा हॉटेल व्यवसायिक व चोरट्यामधील मोबाईल संपर्क कळून आला.

डॉक्टर व पत्नी बचावली हेच पुरे

डॉ. संजय खोपे हे देवमाणूस, ज्या दिवशी चोरी झाली तेव्हा ते व त्यांची पत्नी दोघेच घरी होती. त्यांच्या घराला लोखंडी ग्रील्स आहेत. तरी देखील पहाटे तीन वाजता चोरटा आत आला. मेडिटेशन करण्यासाठी डॉक्टरनी एक खोली तयार केलेली आहे. डॉक्टरच्या पत्नीने रात्री अडीच वाजेपर्यंत मेडिटेशन केले होते. नंतर ती झोपायला गेली व बरोबर तीन वाजता याच खोलीतून चोरटा आत आला. आत पती- पत्नी झोपलेली आहे हे त्याने पाहिले व मग चोरी केली. ज्या कपाटात पाच लाख रुपयांची रोकड व दागिने होते. त्या कपाटाची चावी चोरट्याने डॉक्टर खोपे यांच्या पत्नीच्या पर्समधून काढली. त्याने घरातील फ्रिज देखील उघडला होता पण त्यातील काही खाद्यपदार्थ घेतले नाही. कपाटातील सोने चोरट्याने पळवले. मात्र खोपे व त्यांची पत्नी वाचली एवढे पुरे. एवढेच खूप झाले अशी प्रतिक्रिया खोपे यांच्या हितचितकांमध्ये व मित्रांमध्ये व्यक्त होत आहे.

 

Web Title: thief caught in police honey trap 45 lakh theft from doctor bungalow exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.