दाबोळीत चोरट्यांचा धुमाकूळ, सहा घरे फोडली
By पंकज शेट्ये | Published: January 19, 2024 05:08 PM2024-01-19T17:08:31+5:302024-01-19T17:09:09+5:30
अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे आल्त दाबोळी येथील एकतानगर भागातील सहा घरात हात साफ केला.
पंकज शेट्ये, वास्को: घरात कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे आल्त दाबोळी येथील एकतानगर भागातील सहा घरात हात साफ केला. त्या सहा घरांपैकी ४ घरातून चोरट्यांना पळवण्यास काहीच मिळाले नाही, मात्र दोन घरात असलेले सोन्याचे ऐवज आणि रोख रक्कम मिळून चोरट्यांनी सात लाखाची मालमत्ता लंपास केली. एकतानगर येथे झालेल्या सहा घरातील चोरी प्रकरणात चोरट्यांच्या टोळीचा हात असण्याचा दाट संशय वास्को पोलीस व्यक्त करीत आहेत.
वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार शुक्रवारी पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान तो चोरीचा प्रकार घडला असावा. एकतानगर येथे एकमेकाला टेकून असलेल्या ४० हून जास्त घरापैंकी सहा घरात राहणारे कुटूंबे काही निमित्ताने घर बंद करून बाहेर गेलेली आहेत. घरात कोणीही नसल्याची संधी अज्ञात चोरट्यांनी साधून घरांच्या मुख्य दरवाजाचे टाळे तोडून आत प्रवेश केला. सहा घरापैंकी चार घरातून चोरट्यांना चोरून नेण्यासारखे काहीच मिळाले नाही अशी माहीती पोलीस उपनिरीक्षक मयुर सावंत यांनी दिली. मात्र मौला शेख याच्या घरातून सोन्याचे दागिने आणि २० हजाराची रोख रक्कम मिळून ६ लाख आणि अन्य एका घरातील १ लाखाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची माहीती पोलीस उपनिरीक्षक सावंत यांनी दिली.
दोन्ही घरातून मिळून ७ लाखाची मालमत्ता लंपास करण्यास अज्ञात चोरट्यांना यश आले. शुक्रवारी सकाळी पोलीसांना चोरीची माहीती मिळाताच त्वरित घटनास्थळावर धाव घेतली. तसेच त्यांनी घटनास्थळावर श्वान पथक आणि ठसे तज्ञांना बोलवून पंचनामा केला. एकतानगर येथील चोरी प्रकरणात शामील चोरट्यांबाबत पोलीसांना अजून काहीच कळालेले नसून त्याना गजाआड करण्यासाठी पोलीस सर्व मार्गाने चौकशी करीत आहेत. ह्या चोरी प्रकरणात एक आणि दोन चोरट्यांचा हात नाही तर चोरांच्या टोळीचा हात असावा असा दाट संशय पोलीस उपनिरीक्षक सावंत यांनी व्यक्त केला.
एकतानगर येथील त्या वसाहतीत रात्री १ पर्यंत सुद्धा काही लोक जागे असतात. त्यामुळे ती चोरी पहाटे ३ नंतर घडली असावी असा संशय तेथील काही नागरिकांनी व्यक्त केला. गुरूवारी (दि.१८) त्या भागात एक अज्ञात फकीर दक्षीणा मागण्यासाठी घरा घरात फीरत होता अशी माहीती नागरीकांनी देऊन त्याच्याबाबत संशय व्यक्त केला. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मयुर सावंत अधिक तपास करीत आहेत.