....हा तर भाजप सरकार पुरस्कृत ‘अर्बन नक्षलवादा’चा बळी; विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांचा हल्लाबोल
By किशोर कुबल | Published: January 1, 2024 01:18 PM2024-01-01T13:18:31+5:302024-01-01T13:19:16+5:30
कामांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी
पणजी : स्मार्ट सिटीच्या बेजबाबदारपणामुळे मळा येथे खड्ड्यात पडून माजी नगरसेवकाचा पुत्र आयुष हळर्णकर (२१) हा ठार झाल्याने विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी तीव्र संताप व्यक्त करताना हा भाजप सरकार पुरस्कृत ‘अर्बन नक्षलवादा’चा बळी असल्याचे म्हटले आहे.
युरी म्हणाले कि,‘सरकारच्या घोर निष्काळजीपणामुळे आणि उद्धटपणामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एका कुटूंबात अंधार पसरला. आजपावेतो स्मार्ट सिटीने दोन बळी घेतले. आता कारणे देणे थांबवा आणि बेजबाबदार असलेल्यांवर कारवाई करा. या घटनेस जबाबदार असलेल्या सर्वांवर त्वरित कारवाई व्हायला हवी. युरी पुढे म्हणाले कि,‘ राजधानी शहरातील पीपल्स हायस्कूलजवळील असुरक्षित व उघडे ठेवलेल्या खड्ड्यांचा पर्दाफाश दोनच दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांनी केला होता. परंतु बेजबाबदार आणि निष्काळजी अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही. स्मार्ट सिटीच्या अनागोंदी कारभाराने हा मृत्यू झाला.
इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडने सुमारे १५०० कोटी रुपये खर्च करून हाती घेतलेल्या स्मार्ट सिटीच्या कामाचा जो बोजवारा उडाला आहे त्याला कारणीभूत असलेल्या ‘अर्बन नक्षलवाद्यां’ची नावे जाहीर करण्याचे धाडस मुख्यमंत्री दाखवतील का? दोघांचे जीव घेणाऱ्या, अनेकांना जखमी करणाऱ्या आणि शेकडो वाहनांचे नुकसान करणाऱ्या दोषींवर सरकारने आजपर्यंत काय कारवाई केली, हे मुख्यमंत्री उघड करतील का? आदी सवाल युरी आलेमाव यांनी केले आहेत.
कामांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी
स्मार्ट सिटी आणि अमृत मिशन अंतर्गत झालेल्या सर्व कामांची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करताना युरी यांनी असेही म्हटले आहे की, ‘सरकारने जर माझी मागणी नाकारली तर या कामातील भ्रष्टाचार हा भाजप सरकारच्या आशीर्वादाने झाला असल्याचा आमचा दावा खरा ठरेल.’