अतिक्रमणधारकांना ही अखेरची विनंती, यापुढे होईल कारवाई: मुरगावच्या नगराध्यक्षांचा इशारा
By पंकज शेट्ये | Published: January 4, 2024 04:35 PM2024-01-04T16:35:07+5:302024-01-04T16:35:26+5:30
यापुढे रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करून त्यांना दंड देण्यात येईल अथवा त्याचा माल जप्त करण्यात येणार असल्याची माहीती मुरगावचे नगराध्यक्ष गीरीश बोरकर यांनी दिली.
वास्को: वास्कोतील बाजारात पदपथावर बसून भाजी, फळे विकणाऱ्या व्यापाऱ्यांना रस्त्यावर अतिक्रमण करू नकात अशी विनंती अनेकवेळा करून सुद्धा अनेक व्यापारी त्याचे पालन करत नाहीत. अतिक्रमण करू नकात असे पुन्हा पुन्हा सांगूनसुद्धा पालन होत नसल्याने आता आम्हाला खरोखरच कंटाळा आलेला आहे. यापुढे रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करून त्यांना दंड देण्यात येईल अथवा त्याचा माल जप्त करण्यात येणार असल्याची माहीती मुरगावचे नगराध्यक्ष गीरीश बोरकर यांनी दिली.
वास्कोच्या एफ एल गोंम्स मार्गावरील तात्पुरत्या मासळी मार्केट बाहेरील पदपथावर असलेल्या फळे, भाजी विक्रेत्या व्यापाऱ्यांनी पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण केल्याची माहीती गुरूवारी (दि.४) मुरगाव नगरपालिकेला मिळाली. रस्त्यावर अतिक्रमण केल्याने तेथून जाणाऱ्या पादचाऱ्यांना, वाहन चालकांना त्याचा त्रास होत असल्याचे समजताच मुरगावचे नगराध्यक्ष गीरीश बोरकर यांनी तेथे जाऊन पाहणी केली.
यावेळी त्यांच्याबरोबर नगरसेवक आणि मार्केट समितीचे चेअरमन प्रजय मयेकर, नगरसेवक नारायण बोरकर, मुरगाव नगरपालिकेचे अधिकारी - कामगार उपस्थित होते. फळे - भाजी इत्यादी सामग्री विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे दिसून येताच नगराध्यक्ष गीरीश बोरकर यांनी पालिका कामगारांना ते अतिक्रमण हटवण्यास सांगितले. तसेच त्यांनी व्यापाऱ्यांना तुम्ही तुमच्या दिलेल्या जागेत व्यापार करण्यास सांगून भविष्यात रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे दिसून आल्यास तुमच्या विरुद्ध कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले. भविष्यात अतिक्रमण झाल्यास आम्ही पालिका अधिकाऱ्यांना थेट कारवाई करण्याचे आदेश दिले असून यापुढे आम्ही तुमच्याशी विनंती करण्याकरीता येणार नसल्याचे नगराध्यक्ष बोरकर यांनी व्यापाऱ्यांना सांगितले. भविष्यात कुठलाही व्यापारी रस्त्यावर अतिक्रमण करताना आढळल्यास त्याला दंड अथवा त्याचा माल जप्त करण्याचा आदेश पालिका अधिकारी - कामगारांना देण्यात आल्याचे बोरकर यांनी व्यापाऱ्यांना सांगितले. रस्त्यावर अतिक्रमण होत असल्याने तेथून प्रवास करणाऱ्या पादचारी - वाहन चालकांना त्रास होत असून यापुढे रस्त्यावर अतिक्रमण करू नकात अशी मी तुमच्याशी शेवटची विनंती करत असल्याचे नगराध्यक्ष बोरकर यांनी व्यापाऱ्यांना सांगितले.
यापूर्वी फळे - भाजी विकणारे व्यापारी रस्त्यावर अतिक्रमण करत असल्याची माहीती आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही तेथे जाऊन त्यांना अतिक्रमण करू नकात अशी विनंती केल्याचे बोरकर यांनी पत्रकारांना सांगितले. यापूर्वी सहा ते सात वेळा आम्ही व्यापाऱ्यांना अतिक्रमण करू नकात अशी विनंती केलेली आहे. तरीसुद्धा व्यापारी ऐकत नसल्याने आता आम्हाला त्या गोष्टीचा कंटाळा आलेला आहे. भविष्यात अतिक्रमण झाल्यास पालिकेच्या अधिकाऱ्यांना संबंधित व्यापाऱ्याविरुद्ध कारवाई करून त्याला दंड देण्यास अथवा त्याचे सामान जप्त करण्याचा आदेश दिला आहे. त्या आदेशाची कडकरित्या अंमलबजावणी करण्याबाबतही पालिका अधिकाऱ्यांना कळवल्याचे नगराध्यक्ष बोरकर यांनी सांगितले.