यंदाचा मासिका महोत्सव चार खंडांमधील ११ देशांमध्ये होणार साजरा
By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 23, 2024 04:08 PM2024-05-23T16:08:26+5:302024-05-23T16:08:51+5:30
हा पिरियड फेस्टिव्हल भारत, नेपाळ, पाकिस्तान, अमेरिका, झांबिया, ग्वाटेमाला, केनिया, कोलंबिया, मेक्सिको, एल साल्वाडोर, द डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो येथे साजरा केला जाणार आहे.
ठाणे : क्रीडा, कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे मासिक पाळी बाबतीत असणारे कलंक तोडण्याचा उद्देशाने मासिका महोत्सव भारतासह जगभरात म्युझ फाऊंडेशन आणि इतर संस्थांच्या माध्यमातून साजरा केला जातो. यंदा हा ४ खंडांमधील ११ देशांत, ३३ संस्थांद्वारे साजरा केला जाणार आहे. भारतातच, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, महाराष्ट्र, पुद्दुचेरी, उत्तर प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, कर्नाटक, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि तमिळनाडू या १५ राज्यांमध्ये महोत्सवाची आठवी आवृत्ती आयोजित केली जात आहे. २८ मे पर्यंत हा उत्सव साजरा केला जाणार आहे.
हा पिरियड फेस्टिव्हल भारत, नेपाळ, पाकिस्तान, अमेरिका, झांबिया, ग्वाटेमाला, केनिया, कोलंबिया, मेक्सिको, एल साल्वाडोर, द डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो येथे साजरा केला जाणार आहे. मासिका महोत्सव हा केवळ उत्सव नाही; ही एक चळवळ आहे - जी जात आणि वर्गाच्या अडथळ्यांच्या पलीकडे जाते. विविध प्रकारच्या सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांद्वारे, मासिक पाळीच्या निषिद्धांना आव्हान देणे, पीरियड दारिद्र्य निर्मूलन करणे आणि जगभरात मासिक पाळीबद्दल अर्थपूर्ण संभाषणे सुरू करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर समाजामध्ये मासिक पाळीवर होणारे संभाषणे सामान्य करणे जेणेकरुन एक पिरियड्स-अनुकूल समाज सक्षम होईल हेही याचे लक्ष्य आहे. अनेक संस्कृतींमध्ये सामाजिकरित्या बांधलेल्या मासिक पाळीच्या अनेक नकारात्मक अनुभवांना होकारार्थी आणि सर्जनशील प्रतिसाद म्हणून याची संकल्पना केली जाते. मासिका महोत्सव हा सण आणि उत्सव या संकल्पनेतून मासिक पाळी अनुभवणाऱ्या व्यक्तींना सशक्त करण्याचा प्रयत्न करतो असे म्युझचे निशातं बंगेरा यांनी सांगितले.
अशा प्रकारे होत मासिका महोत्सव साजरा
१. पुद्दुचेरी, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये प्रथमच मासिका महोत्सव साजरा केला जाणार आहे
२. पाकिस्तानमध्ये सलग दुसऱ्यांदा मासिका महोत्सव साजरा केला जाणार आहे
३. नेपाळमध्ये मासिका महोत्सवाने ५ वर्षे पूर्ण केली आणि सहाव्या वर्षात प्रवेश केला
४. मासिका महोत्सव झांबिया आणि केनियामध्ये तीनवर्षे पूर्ण करून चौथ्या वर्षात प्रवेश करत आहे.