भाजपला ताकही फुंकून प्यावे लागणार; विरोधकांची 'ती' मते नक्की कुणाच्या पथ्यावर पडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2024 10:13 AM2024-04-01T10:13:34+5:302024-04-01T10:15:03+5:30

...असा आहे मतांच्या इतिहास, विरोधकांचीही कसोटी

those votes of the opposition will fall on whose path exactly in south goa lok sabha election 2024 | भाजपला ताकही फुंकून प्यावे लागणार; विरोधकांची 'ती' मते नक्की कुणाच्या पथ्यावर पडणार?

भाजपला ताकही फुंकून प्यावे लागणार; विरोधकांची 'ती' मते नक्की कुणाच्या पथ्यावर पडणार?

अजय बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क: विधानसभा निवडणुकीत गत शिरोड्यात भाजपपेक्षा काँग्रेस, आम आदमी, आरजी यांना मिळून मिळालेली मते जास्त होतात. भाजप व विरोधी पक्षांच्या मतांमध्ये खूप मोठी तफावत आहे. विधानसभेवेळी विरोधी पक्षांना मिळालेली ही मते लोकसभा निवडणुकीला नक्की कोणाला मिळतील, हे पाहणे उत्कंठावर्धक आहे. 

विरोधी पक्षाची मतेसुद्धा भाजप आपल्याकडे वळवू शकला तरच इथे भाजपला मोठी आघाडी मिळू शकते. मात्र, विधानसभेची पुनरावृत्ती झाल्यास कधी नव्हे तो भाजप येथे पिछाडीवर पडू शकतो. अशावेळी भाजपला येथे ताकसुद्धा फुंकून प्यावे लागेल. नरेंद्र सावईकर हे उमेदवार असते तर गोष्ट वेगळी होती. 

भाजपमध्ये मुळातच येथे केडर मधले व सुभाष शिरोडकर यांचे कार्यकर्ते मिळून आज इथला भाजप निर्माण झालेला आहे. केडरमधल्या काही कार्यकर्त्यांची धुसफूस ही विधानसभेच्या वेळी आढळून आली होती. दोन्ही गटांचे शंभर टक्के मनोमिलन शक्य तेवढ्या लवकर होणे गरजेचे आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत इथे भाजपला ८३०७, दुसऱ्या स्थानावर असलेल्या आम आदमी पक्षाला ६१३३, आरजी पक्षाला ५०६३, मगो पक्षाला २३९७ व काँग्रेस पक्षाला फक्त १९५३ एवढी मते मिळाली होती.

सुभाष शिरोडकर यांनी या मतदारसंघात नेहमी दहा हजारांचा पल्ला सहज गाठला होता. मात्र, पहिल्यांदाच त्यांना आठ हजार अधिक मतांवर समाधान मानावे लागले. याचे मुख्य कारण म्हणजे आरजी पक्षाने या मतदारसंघात जोरदार मुसंडी मारली होती. खास करून जिथे ख्रिश्चन लोकांची संख्या जास्त आहे तेथे आरजीला भरभरून मते मिळाली होती. त्याचाच परिणाम सुभाष शिरोडकर यांची मतसंख्या कमी होण्यावर झाला. यावेळचासुद्धा कल पाहता अल्पसंख्याकांची मते ही आरजीच्याच पारड्यात पडण्याची जास्त शक्यता आहे. कारण विधानसभेचे पराभूत उमेदवार शैलेश नाईक यांनी निवडून आल्यानंतर लोकांशी जो संपर्क होता तो सुरू ठेवला.

मगो पक्षाला इथे २३९७ मते मिळाली होती. पोटनिवडणुकीत बारा हजार मते मिळवणाऱ्या मगोला नंतरच्या निवडणुकीत एवढी कमी मते का मिळाली, हा संशोधनाचा विषय असू शकतो. सर्वांत महत्त्वाची भूमिका येथे असेल ती म्हणजे माजी मंत्री महादेव नाईक यांची. गत विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या तिकिटावर लढताना त्यांनी तब्बल ६१३३ मते घेतली होती. प्रत्यक्षात तसे पाहायला गेल्यास इथे आम आदमी पक्षाचे पूर्वीही काम नव्हते. आजही तसे काम काहीच नाही. त्यामुळे ही जी भरभक्कम मते मिळाली होती ती आम आदमी पक्षाची म्हणण्यापेक्षा महादेव नाईक यांचीच होती.

लोकसभा निवडणुकीत महादेव नाईक कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. वावड्या उठत आहेत की महादेव नाईक हे भाजपमध्ये येतील.

...तर आरजीला फायदा

समजा, भाजपमध्ये ते आले तर ही मते ते भाजपकडे वळवतील. भाजपची व महादेव नाईक यांच्या माध्यमातून आम आदमी पक्षाला मिळालेली मते मिळून येथे भाजपला भरभक्कम आघाडी मिळू शकते. आजच्या घडीला आरजी पक्षाची ५००० व काँग्रेसची २००० मते अधिक केली, तर आरजी येथे यावेळी सात हजारांचा पल्ला नक्की गाठेल.

...असा आहे मतांच्या इतिहास

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला येथे ४८% मते मिळाली होती, तर भाजपला ४७ टक्के मते मिळाली होती. यादरम्यान सुभाष शिरोडकर काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे काँग्रेसला भाजपपेक्षा एक टक्का मते जास्त मिळाली. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ३८ टक्के मते मिळाली होती, तर भाजपला ५२ टक्के मते मिळाली होती. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त ३४%, तर भाजपला तब्बल ६० टक्के मते मिळाली होती.

 

Web Title: those votes of the opposition will fall on whose path exactly in south goa lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.