हेल्मेट न वापरणाऱ्यांनी अवयवदान करावे; गोवा पोलीस महासंचालकाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 09:01 PM2019-02-05T21:01:16+5:302019-02-05T21:01:49+5:30
सध्या वाहतूक सुरक्षा सप्ताह सुरू असल्यामुळे पोलीस खात्याकडून वाहतूक नियमासंबंधी जागृती सुरू आहे.
पणजी : हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्यांना गोव्याचे पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी अवयवदानाचा सल्ला दिला आहे. राज्यात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी कठोरपणे केली जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सध्या वाहतूक सुरक्षा सप्ताह सुरू असल्यामुळे पोलीस खात्याकडून वाहतूक नियमासंबंधी जागृती सुरू आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी आल्तिनो पणजी येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता. बिगर सरकारी संस्था व इतर नागरिकांच्या उपस्थितीत बोलताना पोलिस महासंचालकांनी दुचाकी चालकांना हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहन केले. ताज्या आकडेवारीनुसार राज्यात घडलेल्या अपघातात हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्यांचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. उलट हेल्मेट घातलेल्या व्यक्ती बचावल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. याचाच अर्थ हेल्मेट न घालता दुचाकीची सवारी केली आणि दुर्दैवाने अपघात घडला तर वाचण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे हेल्मेटचा वापर नेहमी करावा. ज्या कुणी हेल्मेटचा वापर करणारच नाही, असे ठरविले आहे अशा लोकांनी अवयवदानासाठी नावनोंदणी करावी, असा सल्ला त्यांनी दिला.
गोवा सेन्टीनल योजनेचे यश सांगताना त्यांनी या योजनेमुळे अपघाती मृत्यूची संख्या घटल्याचे सांगितले. ही योजना यशस्वी झाली असून मुंबई पोलिसांनीही आता गोव्याचा कित्ता गिरविला आहे. मुंबईतही आता गोवा सेन्टीनल योजना सुरू केली जाणार आहे असे ते म्हणाले. ट्रॅफिक सेन्टीनल योजनेद्वारे २०१८ वर्षात ८ लाख लोकांना वाहतूक नियमांच्या उल्लंघनासाठी दंड दिला आहे. १४.५ लाख लोकसंख्येच्या गोव्यात ही संख्या निम्याहून अधिक ठरत आहे. १० कोटी रुपये दंडाच्या रुपाने वसूल करण्यात आले आहेत.
गोवा पोलिसांनीही रस्त्यावर राहून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंडित केले आहे. सर्वात म्हत्त्वाचे म्हणजे एकूण ३४ जणांना नशेत गाडी चालविण्यासाठी तुरुंगाची हवा खायला भाग पाडले. अजूनही १७५४ प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. या प्रलंबितांत नशेबाज चालकांची प्रकरणेही आहेत. त्यामुळे नशा करून वाहने चालविण्यासाठी तुरुंगात जाणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता फार आहे.