मनाने मवाळ असलो तरी वेळप्रसंगी कणखर निर्णयही घेतले- दिगंबर कामत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 07:04 PM2019-12-13T19:04:11+5:302019-12-13T19:04:19+5:30
मुख्यमंत्री असताना मला विरोध मवाळ मुख्यमंत्री म्हणायचे. आताही मी मवाळ विरोधी पक्षनेता अशी टीका माझ्यावर होते.
मडगाव: मुख्यमंत्री असताना मला विरोध मवाळ मुख्यमंत्री म्हणायचे. आताही मी मवाळ विरोधी पक्षनेता अशी टीका माझ्यावर होते. मी जरी मनाने मवाळ असलो तरी वेळप्रसंगी कणखर निर्णयही घेऊ शकतो हे मी मुख्यमंत्री असताना गोव्यातील सेझ प्रकल्प रद्द करून दाखवून सिद्ध केले होते. मंजुर झालेले सेझ प्रकल्प रद्द करणारा मी देशातील एकमेव मुख्यमंत्री होतो, असे दिगंबर कामत यांनी बोलून दाखविले.
13 डिसेंबर रोजी कामत यांनी आपल्या आमदारकीची 25 वर्षे पूर्ण केल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्यांचा शुक्रवारी एक छोटेखानी सत्कार केला. त्यावेळी बोलाना काहीसे भावुक झालेल्या कामत यांनी या कार्यकर्त्यांच्याच पाठिंब्यामुळे आपण ही मजल मारू शकलो म्हणून सर्व कार्यकर्त्यांना आणि मडगाववासीयांना धन्यवाद दिले. मडगावकरांना मी त्यांच्यासाठी आणखीही हवा आहे हे या सत्काराने दाखवून दिले आहे, असेही सूचक उद्गार त्यांनी काढले.
10 डिसेंबर 1994 रोजी दिगंबर कामत पहिल्यांदा मडगावातून आमदार म्हणून निवडून आले होते. यासंबंधीची अधिकृत अधिसूचना 13 डिसेंबर 1994 रोजी जारी झाली होती. त्यामुळे अधिकृतरित्या काल 13 डिसेंबरला त्यांनी आपल्या आमदारकीची 25 वर्षे पूर्ण केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, काही विरोधक माझ्यावर मी मडगावसाठी काहीच केले नाही अशी टीका करतात. मात्र मी त्या टीकेची पर्वा करीत नाही. मी काय केले आहे ते सर्व मडगावकरांना माहीत आहे. त्यामुळेच मागची 25 वर्षे ते मला निवडून देत आहेत. सामान्य मडगावकराला चांगले दिवस येणे हाच माझ्या दृष्टीने सर्वात मोठा विकास असल्याचे ते म्हणाले.
कुणाशीही भांडण करण्याचा आपला स्वभाव नाही त्यामुळे आक्रस्ताळेपणा करूनच विरोध करता येतो हे मला अजिबात मान्य नाही. मी विरोधी पक्षनेता म्हणून आक्रस्ताळेपणा कधीही करणार नाही. असे जरी असले तरी काँग्रेसला परत गोव्यात सत्ता मिळावी यासाठी माझे प्रयत्न चालूच राहणार आहेत आणि एक दिवस ही सत्ता पुन्हा काँग्रेसकडे येईल याची आपल्याला पूर्ण खात्री असल्याचेही ते म्हणाले. शुक्रवारी कामत यांची विविध स्तरातील व्यक्तींनी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यात स्वातंत्र्य सैनिक, काँग्रेसचे कार्यकर्ते, मडगावचे व्यापारी, मडगावचे नगरसेवक तसेच त्यांच्य अन्य समर्थकांचा समावेश होता. यावेळी मडगावच्या नगरसेवकांनी त्यांना फळांची परडी भेट दिली. या कार्यकर्त्यांनी आणलेला केक कामत यांनी आपली नात राधा हिच्यासह कापून आपला आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांच्या पत्नी आशा, पुत्र योगीराज व सून नेहा हेही उपस्थित होते.