जांबावलीतील प्रसिद्ध गुलालोत्सव उदंड गर्दीत संपन्न, हजारो भाविकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 06:13 PM2018-03-13T18:13:42+5:302018-03-13T18:13:42+5:30
गोव्यातील प्रमुख उत्सवांपैकी एक़ असलेला जांबावलीतील प्रसिद्ध गुलालोत्सव आज मंगळवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुलालाची उधळण करत साजरा केला गेला. या उत्सवानिमित्त हजारो भाविक आज दुपारी जांबावलीच्या श्रीरामनाथ दामोदर देवस्थानच्या प्राकारात जमल्याने या लहानशा गावाला एका मोठय़ा जत्रेचे स्वरुप आले होते.
मडगाव : गोव्यातील प्रमुख उत्सवांपैकी एक़ असलेला जांबावलीतील प्रसिद्ध गुलालोत्सव आज मंगळवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुलालाची उधळण करत साजरा केला गेला. या उत्सवानिमित्त हजारो भाविक आज दुपारी जांबावलीच्या श्रीरामनाथ दामोदर देवस्थानच्या प्राकारात जमल्याने या लहानशा गावाला एका मोठय़ा जत्रेचे स्वरुप आले होते.
मडगावपासून 20 कि.मी. अंतरावर असलेल्या जांबावलीतील हा गुलालोत्सव गोव्यातील मुख्य उत्सवापैकी एक असून त्यात गोव्याबरोबरच कर्नाटकातील असंख्य भाविकांनी भाग घेतला. दुपारी 3 वाजता श्री दामोदराची पालखी शिगम्याच्या मंटपात आल्यानंतर भाविकांनी श्रीरामनाथ दामोदर महाराज की जय असा जयघोष करीत पालखीवर गुलाल उधळला व त्यानंतर एकमेकांना गुलाल फासून आनंदोत्सव साजरा केला.
या उत्सवासाठी हजारो भाविक एकाचबरोबर जांबावलीत उपस्थित असल्याने वाहतूकीवरही ताण आला होता. त्यामुळे काही ठिकाणी वाहनांच्याही रांगा लागलेल्या दिसत होत्या. गोव्यातील आर्थिक राजधानी म्हणून गणल्या जाणा-या मडगावातला श्री दामोदर हा ग्रामदेव त्यामुळे मडगावातील भाविक मोठय़ा संख्येने जांबावलीला गेल्याने सायंकाळी मडगावची बाजारपेठही ओस पडली होती. ऐतिहासिक दस्ताऐवजाप्रमाणो 16व्या शतकात पोतरुगीजांनी गोव्यात बळजबरीचे धर्मातर सुरु केल्यानंतर कित्येकांनी आपले देव घेऊन पोतरुगीज हद्दीच्या बाहेर पलायन केले. त्यावेळी मडगावातील दामोदराचे स्थलांतर त्यावेळच्या आदिलशाही प्रदेशात असलेल्या जांबावलीत झाले होते. फाल्गुन महिन्यात या देवाचा पाच दिवसांचा शिशिरोत्सव साजरा केला जात असून हा उत्सव मुळ मडगावकरांतर्फे साजरा केला जात असतो.