मासळी आयात बंद झाल्याने गोव्यात हजारो बेरोजगार, संघटनेचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 03:34 PM2018-11-02T15:34:35+5:302018-11-02T15:35:25+5:30
गोव्यात येणाऱ्या मासळीमध्ये फॉर्मेलिन हे घातक रसायन असते, असा दावा राजकारण्यांनी करून गोमंतकीयांमध्ये मोठी भीती निर्माण केली.
पणजी : गोव्याला होणारी रोजची मासळी आयात बंद झाल्यामुळे गोव्यातील सुमारे दहा हजार व्यक्तींच्या रोजगारांवर गदा आली. त्यामुळे गोव्यातील हजारो तरुण बेरोजगार बनले आहेत, असा दावा घाऊक व किरकोळ मासळी विक्रेत्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
गोव्यात येणाऱ्या मासळीमध्ये फॉर्मेलिन हे घातक रसायन असते, असा दावा राजकारण्यांनी करून गोमंतकीयांमध्ये मोठी भीती निर्माण केली. फॉर्मेलिनचा वापर माशांसाठी होतच नाही. सरकारने व विरोधकांनीही उगाच भीती निर्माण केली असे इब्राहिम मुसा, शशिकला गोवेकर, फेलिक्स आदी विविध मासळी विक्रेता व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. गोव्यातील सर्व मासळी बाजारपेठांमध्ये सरकारच्या अन्न व औषध प्रशासन खात्याने तातडीने प्रयोगशाळा सुरू कराव्यात आणि रोज सकाळी मासळी तपासली जावी, अशी मागणीही त्यांनी केली. सरकार विषयाचा अभ्यास न करता, मासळीची आयात बंद करते. आम्ही सरकारच्या सगळ्या अटी मान्य करण्यास तयार आहोत. आरोग्य मंत्री तसेच आरोग्य सचिवांची आम्ही भेट मागितली पण आम्हाला ते भेटतसुद्धा नाहीत. कुणीच आमदार आमच्याशी फॉर्मेलिनच्या विषयाबाबत चर्चाच करायला येत नाहीत. सगळी मासळी आयात बंद झाल्यामुळे पाच ते दहा हजार व्यक्तींच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्राहकांमध्ये भीती व संशय असल्याने ग्राहक मासळी खरेदीसाठी येत नाहीत. मोठी मासळी खरेदी केली जात नाही. हॉटेल व्यवसायिकही अडचणीत येऊ लागले आहेत. सरकारने या स्थितीतवर त्वरित उपाय काढावा, अन्यथा दहा दिवसांनंतर मासळी व्यवसायाशीनिगडीत लोक रस्त्यावर येतील. गोव्यात जी मासळी पकडली जाते ती गोव्यातील ग्राहकांसाठी पुरेशी नाही. आम्ही चाळीस वर्षे मासळी व्यवसायात आहोत. फॉर्मेलिनचे नावही कधी आम्ही ऐकले नव्हते. सरकारने फॉर्मेलिन रसायनाचा पुरवठाच बंद करा, निर्मितीही बंद करावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.