त्या ‘ई मेल’ ने दोन्ही विमानतळावर उडवली खळबळ
By पंकज शेट्ये | Published: April 29, 2024 04:33 PM2024-04-29T16:33:25+5:302024-04-29T16:34:51+5:30
दाबोळी आणि मोपा विमानतळावर ‘बॉम्ब’ असल्याचे आले ई मेल
पंकज शेट्ये, लोकमज न्यूज नेटवर्क, वास्को: गोव्याच्या दाबोळी आणि मोपा विमानतळावर ‘बॉम्ब’ असल्याचा ई मेल विमानतळ प्राधिकरणाला आल्यामुळे सोमवारी (दि.२९) दुपारी दोन्ही विमानतळावर खळबळ उडाली. ‘बॉम्ब’ असल्याचा ई मेल आल्यानंतर दोन्ही विमानतळावर सर्व सुरक्षा यंत्रणांनी कडक रित्या तपासणी केली असता सर्वकाही सुरक्षित असल्याचे आढळून आले. दरम्यान दोन्ही विमानतळावरील विमानसेवेत कुठल्याच प्रकारचा विलंब न होता प्रवासी विमानांची वाहतूक वेळेनुसार होत असल्याची माहीती प्राप्त झाली.
सोमवारी दुपारी विमानतळ प्राधिकरणाला दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळावर आणि उत्तर गोव्यातील मोपा विमानतळावर ‘बॉम्ब’ असल्याचा ई मेल आला. ‘बॉम्ब’ असल्याचा ई मेल आल्यानंतर विमानतळ प्राधिकरणाने दोन्ही विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांना त्वरित त्याबाबत माहीती दिली. ‘बॉम्ब’ असल्याचा ई मेल आल्याची माहीती प्राप्त झाल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी, पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी विमानतळावरील सर्व परिसराची आणि तेथे येणाऱ्या प्रवासी इत्यादींची कडकरित्या तपासणी केली. दोन्ही विमानतळावर कडक रित्या तपासणी केली असता ‘बॉम्ब’ बाबत आलेले ते ई मेल खोटी अफवा पसरविण्यासाठी आल्याचे उघड झाले.
अधिक माहीतीसाठी दाबोळी विमानतळाचे संचालक धनंजय राव यांना संपर्क केला असता दाबोळी विमानतळावर ‘बॉम्ब’ असल्याचा ई मेल आल्याच्या माहीतीला त्यांनी दुजोरा दिला. सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण दाबोळी विमानतळावर कडकरित्या तपासणी केली असता सर्व काही सुरक्षित असल्याचे आढळून आल्याची माहीती त्यांनी दिली. त्या ई मेल मुळे प्रवासी विमान वाहतूकीला कुठल्याच प्रकारचा विलंब झाला नसून सर्व विमाने प्रवाशांना घेऊन वेळेवरच निघाली आणि उतरली अशी माहीती धनंजय राव यांनी दिली. ‘बॉम्ब’ बाबत आलेले ई मेल खोटी अफवा पसरवण्यासाठी आल्याचे उघड झाले असून ते कोणी पाठवले त्याबाबतही चौकशी चालू असल्याची माहीत विमानतळावरील सूत्रांकडून मिळाली. ई मेल खोटी अफवा पसरविण्यासाठी आल्याचे एकंदरीत उघड झाले असलेतरी दोन्ही विमानतळावर संध्याकाळ पर्यंत कडकरित्या तपासणी केली जात असल्याची माहीती मिळाली.