हणजूण येथे आयपीएलवर बेटिंग घेणाऱ्या तिघांना अटक
By admin | Published: April 18, 2017 10:15 PM2017-04-18T22:15:07+5:302017-04-18T22:15:39+5:30
आयपीएल क्रिकेटवर सट्टा (बेटिंग) घेणाऱ्या तीन सट्टेबाजांना उत्तर गोव्यातील हणजूण पोलिसांनी जिल्हा शोध पथकाच्या साहाय्याने ताब्यात घेतले.
ऑनलाइन लोकमत
म्हापसा, दि. 18 - आयपीएल क्रिकेटवर सट्टा (बेटिंग) घेणाऱ्या तीन सट्टेबाजांना उत्तर गोव्यातील हणजूण पोलिसांनी जिल्हा शोध पथकाच्या साहाय्याने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख १५,२७० रुपये, दोन लॅपटॉप, ११ मोबाईल फोन, एक एलईडी टीव्ही सेट टॉप बॉक्ससह जप्त करण्यात आले आहे.
गाववाडी-हणजूण येथील काझा दिल सॉल इमारतीच्या एका बंद फ्लॅटमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल क्रिकेट स्पर्धेतल्या सामन्यासंदर्भात सट्टा घेतला जात असल्याची खबर हणजूण पोलीस स्टेशनचा तात्पुरता ताबा घेतलेले निरीक्षक राहुल परब यांना मिळाली. १८ रोजी पहाटे १ वा. जिल्हा शोध पथकाचे (डिस्ट्रीक इन्वेस्टिगेशन युनिट) निरीक्षक परेश नाईक व त्यांच्या पथकाने गाववाडी-हणजूण येथील काझा दिल सॉल इमारतीत ए-वन फ्लॅटवर धाड टाकली.
यावेळी तिथे सट्टा घेणारे किरणसिंग हरिसिंग वाघेला (३२, रा. अहमदाबाद गुजरात), जयंती शिवलाल वाघेला (३३, रा. विजापूर, अहमदाबाद, वाघेला) व नरेंद्र सिंग दत्ताराम यादव (३३, रा. आग्रा, उत्तर प्रदेश) या तिघा सट्टेबाजांच्या रॅकेटास अटक करून बेटिंगसाठी वापरण्यात येणारे ११ मोबाईल फोन, दोन लॅपटॉप, एक सेट टॉप बॉक्ससह एलईडी टीव्ही व रोख १५,२७० रुपये जप्त केले. अटक केलेल्या तिन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असताा न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली.