तीन तालुक्यांत उद्यापर्यंत ‘ड्राय डे’
By admin | Published: October 14, 2014 01:42 AM2014-10-14T01:42:13+5:302014-10-14T01:46:21+5:30
पणजी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनिमित्त गोव्यातील तीन तालुक्यांतील दहा पंचायत क्षेत्रांतील एकूण पंधरा गावांमधील मद्यालये बंद ठेवण्याचा आदेश जारी झाला आहे.
पणजी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनिमित्त गोव्यातील तीन तालुक्यांतील दहा पंचायत क्षेत्रांतील एकूण पंधरा गावांमधील मद्यालये बंद ठेवण्याचा आदेश जारी झाला आहे. गोवा सरकारच्या अर्थ खात्याने याबाबतचा आदेश जारी केला आहे.
डिचोली, सत्तरी व पेडणे हे गोव्याचे तीन तालुके महाराष्ट्राच्या सीमेवर वसले आहेत. सोमवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून या तालुक्यांतील पंधरा गावांतील मद्यालये बंद झाली. दि. १५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही मद्यालये बंद राहतील. त्यानंतर १९ रोजी सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत मद्यालये उघडता येणार नाहीत, असे अर्थ खात्याच्या आदेशात म्हटले आहे. दि. १९ हा महाराष्ट्रात मतमोजणीचा दिवस आहे.
डिचोली तालुक्यातील लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील दोडामार्ग व खरपाल भाग तसेच साळ पंचायत क्षेत्रातील खोरगिरे व खोलपे येथे मद्यालये सुरू ठेवता येणार नाहीत. पेडणे तालुक्यातील केरी पंचायत क्षेत्रातील तेरेखोल, तोर्से पंचायत क्षेत्रातील पत्रादेवी, इब्रामपूर पंचायत क्षेत्रातील हणखणे व हादूस येथे आणि पालये पंचायत क्षेत्रातील किरणपाणी येथे मद्यालये सुरू ठेवता येणार नाहीत. सत्तरी तालुक्यातील केरी पंचायत क्षेत्रातील शिरोली व रावण कॉलनी येथे मद्यालये सुरू ठेवता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. म्हावळींगे व कुडचिरे या डिचोली तालुक्यातील गावांतही मद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या तिन्ही तालुक्यांतील अबकारी अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे. या तिन्ही तालुक्यांतील गावांमध्ये कोण किती प्रमाणात मद्य स्वत:जवळ ठेवू शकतो किंवा त्याची वाहतूक करू शकतो याचे नवे प्रमाणही निवडणूक काळापुरते निश्चित करण्यात आले आहे. (खास प्रतिनिधी)