मडगावात तीन दिवसांत सहा छाप्यात 13 लाखांचा चिनी माल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 05:13 PM2017-12-15T17:13:36+5:302017-12-15T17:14:23+5:30
मडगाव : ख्रिसमस सणनजीक येऊन ठेपला असताना गोव्यातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात चिनी मालांची रेलचेल दिसून येत असून, वजन माप खाते तसेच पोलिसांनी आता हा माल ठेवणा-या व्यापा-यावर कारवाईचे सत्र सुरू केले आहे.
मडगाव : ख्रिसमस सणनजीक येऊन ठेपला असताना गोव्यातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात चिनी मालांची रेलचेल दिसून येत असून, वजन माप खाते तसेच पोलिसांनी आता हा माल ठेवणा-या व्यापा-यावर कारवाईचे सत्र सुरू केले आहे. गेल्या तीन दिवसांत दक्षिण गोव्यातील मडगावात सहा छापा टाकले असून, 13 लाखांचा माल जप्त केला आहे. यातील पाच छापे वजनमापे खाते तर एक छापा मडगाव पोलिसांनी टाकला आहे.
बुधवारी वजन माप खात्याने मडगावातील भालभाट परिसरात एका दुकानावर छापा टाकून दोन लाखांचा माल जप्त केला होता. ख्रिसमससाठी रोषणाई व अन्य उपकरणे जप्त करण्यात आली होती. त्याच दिवशी मडगाव पोलिसांनी बेकायदा सिगारेट व्यवसायावर कारवाई करताना हिराराम उर्फ शाम रावत मिर्धा याला अटक करून तब्बल तीन लाख सोळा हजार रुपये किमतीच्या सिगारेट्स जप्त केल्या होत्या. चीन तसेच मध्य आशियाई देशातून या सिगारेटची आयात होत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
वजन माप खात्याने गुरुवारी आके - मडगाव व नावेली येथे दोन दुकानांवर छापा टाकून तीन लाखांचा माल जप्त केला होता. चिनी बनावटीचा माल येथे विकला जात होता. आज शुक्रवारी या खात्याने मडगाव - कोलवा मार्गावरील जैन इलेक्ट्रिकल या दुकानावर छापा टाकून पाच लाखांचा माल जप्त केला. चिनी बनावटीचा हा माल असून, मालावर किंमत तसेच अन्य छापील बाबींचा उल्लेख नव्हता. एका गि-हाईकाने यासंबंधी तक्रार केल्यानंतर वजन माप खात्याने या दुकानावर छापा मारला.