Coronavirus News: नऊ दिवसांत चिखली गावातील तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू; गावात भीतीचं वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 07:53 PM2020-07-14T19:53:46+5:302020-07-14T19:54:12+5:30

लॉकडाऊनसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊनही कार्यवाही नाही

three died due to coronavirus in goas chikhali village | Coronavirus News: नऊ दिवसांत चिखली गावातील तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू; गावात भीतीचं वातावरण

Coronavirus News: नऊ दिवसांत चिखली गावातील तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू; गावात भीतीचं वातावरण

Next

वास्को: मंगळवारी (दि. १४) पहाटे दक्षिण गोव्यातील दाबोळी मतदारसंघातील चिखली गावात राहणाऱ्या आगुस्तीनो फर्नांडीस या ४७ वर्षीय व्यक्तीचे मडगावच्या कोविड इस्पितळात उपचार घेत असताना निधन झाल्याने मुरगाव तालुक्यातील कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या १२ वर पोहोचली आहे. आगुस्तीनो हा मुरगाव तालुक्यातील नाकेली, चिखली गावातील रहिवासी असून ९ दिवसांत चिखली ग्रामपंचायत क्षेत्रातील तिसऱ्या नागरिकाचा कोरोनाची बाधा झाल्यानंतर मृत्यू झाल्याने या गावातील नागरिकांत मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

नाकेली, चिखली येथे राहणारा आगुस्तीनो पंचायत घराच्या थोड्याच अंतरावर चहा व इतर सामग्री विकणारा गाडा चालवत होता. काही काळापूर्वी त्याला व त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळल्यानंतर त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्याच्या घरातील कोरोना बाधित झालेले इतर सदस्य ठिक झाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आल्याची माहीती चिखली पंचायतीचे पंच सदस्य युवराज वळवईकर यांच्याकडून प्राप्त झाली. आगुस्तीनो याचा मंगळवारी इस्पितळात उपचार घेत असताना मृत्यू झाला. गोव्यात कोरोनाची बाधा झाल्यानंतर मरण पावलेल्यांची संख्या १८ वर पोहोचली असून यापैकी १२ जण मुरगाव तालुक्यातील रहिवासी होते. मागच्या ९ दिवसांत चिखली ग्रामपंचायत क्षेत्रातील तीन इसमांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे.

मुरगाव नगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक पाश्कॉल डी’सोझा चिखली भागात राहत असून ५ जुलै रोजी कोरोना विषाणूवर उपचार घेताना त्यांचा मृत्यू झाला. यानंतर १२ जुलैला चिखली गावात राहणाऱ्या सुशीलाबाई चिपळूणकर या ८० वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून आता आगुस्तीनो या ग्रामस्थाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबाधा झाल्यानंतर या गावातील मृत्यू झालेल्यांची संख्या तीनवर पोहोचली आहे.

याबाबत माहिती घेण्यासाठी चिखली पंचायतीचे सरपंच सेबी परेरा यांना संपर्क केला असता सदर गावातील तीन नागरिकांचा कोरोनाची बाधा झाल्यानंतर मृत्यू झाल्याने नागरिकात चिंता तसेच भिती वाढल्याचे ते म्हणाले. सुरुवातीला जेव्हा चिखली पंचायतीच्या क्षेत्रातील ३६ नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले, त्यावेळी आपण पंचायतीच्या इतर सदस्यांच्या सहमतीनंतर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्याची मागणी केली होती. तसेच तेव्हा ७ दिवस चिखली पंचायत नागरिकांसाठी बंद करण्यात आली होती अशी माहिती परेरा यांनी दिली. 

सरकारकडे लॉकडाऊनची मागणी केली, मात्र येथे लॉकडाऊन करण्यात आलेले नसल्याचे परेरा यांनी सांगितले. सरकारने लॉकडाऊन केल्यास त्याचे सक्तीने पालन होते कारण पोलीस सुरक्षा तसेच इतर या लॉकडाऊनसाठी असलेल्या गोष्टींची सुविधा योग्यरित्या होऊ शकते. सरकारने लॉकडाऊन केले नसल्याने आम्ही जर लॉकडाऊन केले तर नागरिक याचे पालन करणार नसून याचा काहीच फायदा होणार नसल्याचे परेरा यांनी सांगितले. चिखली पंचायतीचा सरपंच या नात्याने आपण तसेच या पंचायतीचे पंच सदस्य या गावातील नागरिकांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी त्यांच्याशी घरातच राहण्याची विनंती केलेली असल्याची माहिती परेरा यांनी देऊन बरेच जण स्व:ताच्या व दुसऱ्यायाच्या हितासाठी याचे पालन करत असल्याचे सांगितले. 

चिखली भागात कोरोना बाधित रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात जर पुन्हा वाढ होण्यास सुरवात झाल्यास आम्ही बैठक घेऊन पंचायत पुन्हा काही काळासाठी नागरिकांकरिता बंद करणार आहोत. काही दिवसापूर्वी दाबोळीचे आमदार तथा मंत्री मवीन गुदिन्हो यांनी सुद्धा वास्कोत लॉकडाऊन करण्याची गरज असल्याची मागणी केली होती, मात्र सरकारने त्यांचे सुद्धा एकले नसून लॉकडाऊन का करण्यात येत नाही अशा प्रकारचा परेरा यांनी प्रश्न उपस्थित केला.
 

Web Title: three died due to coronavirus in goas chikhali village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.