युरिया प्लांटमध्ये झालेल्या स्फोटात तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 08:46 PM2022-05-03T20:46:35+5:302022-05-03T20:47:38+5:30
स्फोटात मरण पोचलेले तीनही कामगार प्लांटच्या देखभालीचे काम घेतलेल्या ‘बोकारो इंडस्ट्रीयल वर्क’ या कंत्राटदार कंपनीचे आहेत.
वास्को: मंगळवारी (दि.३) दुपारी झुआरी एग्रो कॅमिकल्सच्या युरीया प्लांट मध्ये वार्षीक देखभालीचे काम चालू असताना तेथील ‘कंडेंन्सेटड’ टाकी मध्ये झालेल्या भयंकर स्फोटात तीन कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाला. स्फोटात मरण पोचलेले तीनही कामगार प्लांटच्या देखभालीचे काम घेतलेल्या ‘बोकारो इंडस्ट्रीयल वर्क’ ह्या कंत्राटदार कंपनीचे आहेत. त्या टाकीचे देखभालीचे काम थंड वातावरणात करायला पाहीजे, मात्र त्या कामगारांनी काम करताना ‘बोल्ट’ काढण्यासाठी आणि इतर कामासाठी ‘गॅस कटर’ चा वापर केल्याने टाकीत स्फोट होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलीसांना प्रथम चौकशीत दिसून आल्याची माहीती सूत्रांनी दिली.
झुआरीनगर येथील झुआरी एग्रो कॅमिकल्सच्या युरीया प्लांट चे दरवर्षी देखभालीचे काम हातात घेण्यात येते. त्यानुसार ३० एप्रिल रोजी प्लांट एका महीन्यासाठी बंद करून देखभालीचे काम हातात घेण्यात आले होते. हे काम ‘बोकारो इंडस्ट्रीयल वर्क’ ह्या कंत्राटदार कंपनीला देण्यात आल्यानंतर मंगळवारी दुपारी त्यांचे तीन कामगार तेथे असलेल्या ‘कंडेंन्सेटड’ टाकीच्या वर चढून काम करत होते. देखभालीचे काम चालू असल्याने जरी ती टाकी खाली असलीतरी त्याच्या आत रसायन वायू गॅसच्या असण्याची शक्यता असते व त्यामुळे तेथे थंड वातावरणात काम करणे गरजेचे असते. ३०० क्यूबीक मीटर ची क्षमता असलेल्या त्या टाकीच्या वरील झाकणे काढण्याचे काम ते कामगार करत होते. त्यांनी झाकणे उघडण्यासाठी त्याला असलेले ‘बोल्ट’ काढण्याकरिता ‘गॅस कटर’ चा वापर केल्याची माहीती पोलीस आणि विश्वसनीय सूत्रांनी देऊन त्यामुळे तेथे गरम वातावरण निर्माण होऊन टाकीत भयंकर स्फोट झाल्याचे सांगितले. त्या भयंकर स्फोटात टाकीच्या देखभालीसाठी वर चढलेले ते तीन कामगार टाकीवरून सुमारे ३० मीटर दूर उसळून जमनिवर कोसळले व त्यात ते गंभीररित्या जखमी झाले. टाकीत स्फोट होऊन तीन कामगार गंभीर जखमी झाल्याचे तेथे असलेल्यांना दिसून येताच त्या तिघांना त्वरित उपचारासाठी चिखली येथील खासगी इस्पितळात नेण्यात आले, मात्र इस्पितळात आणण्यापूर्वीच वाटेवरच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
मंगळवारी झुआरी एग्रो कॅमिकल्समध्ये स्फोट होऊन मरण पोचलेल्या त्या तीन कंत्राटदार कामगारांची नावे इंन्द्रजीत घोष (वय ४०, पच्छीम बंगाल), मृथ्यूंनजन चौधरी (वय २८, बिहार) आणि कशकरण सिंग (वय ३२, पंजाब) अशी असल्याची माहीती पोलीस सूत्रांनी दिली. झुआरी एग्रो कॅमिकल्सच्या प्लांटमध्ये स्फोट होऊन तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहीती मिळताच मुरगावचे उपजिल्हाधिकारी दत्तरात गवस देसाई, मुरगाव पोलीस उपअधीक्षक निलेश राणे, वेर्णा पोलीस अधिकारी, कारखाना व बाष्पक खात्याचे अधिकारी आणि इतर अधिकाºयांनी त्वरित घटनास्थळावर धाव घेऊन घडलेल्या घटनेच्या चौकशीला सुरवात केली. ह्या प्रकरणात अधिक तपास चालू आहे.