गोव्यात भंडारी समाजाचे आता तीन मंत्री!; २५ टक्के प्रमाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 10:54 PM2018-09-24T22:54:46+5:302018-09-24T22:55:04+5:30
गोव्यात मिलिंद नाईक यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भंडारी समाजाच्या एकूण मंत्र्यांची संख्या आता तीन झाली आहे. दक्षिण गोव्यात आगामी लोकसभा निवडणुकीत भंडारी समाजाच्या मतांवर डोळा ठेवून या समाजाला आणखी एक मंत्रिपद दिले गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
पणजी : गोव्यात मिलिंद नाईक यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भंडारी समाजाच्या एकूण मंत्र्यांची संख्या आता तीन झाली आहे. दक्षिण गोव्यात आगामी लोकसभा निवडणुकीत भंडारी समाजाच्या मतांवर डोळा ठेवून या समाजाला आणखी एक मंत्रिपद दिले गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. १२ सदस्यीय मंत्रिमंडळात आता भंडारी मंत्र्यांचे प्रमाण २५ टक्के झाले आहे.
राज्यात भंडारी समाजाची लोकसंख्या २७ टक्के आहे. तेवढे आरक्षणही या समाजाला मिळत आहे. मंत्रिमंडळात जलस्रोतमंत्री विनोद पालयेंकर आणि गृहनिर्माणमंत्री जयेश साळगांवकर हे दोघे भंडारी समाजाचे मंत्री होते. त्यात आता मिलिंद यांची भर पडली आहे. समाजातर्फे या गोष्टीचे स्वागत करण्यात आले.
गोमंतक भंडारी समाजाचे महासचिव उपेंद्र गांवकर यांनी मिलिंद यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल स्वागत केले आहे. ते म्हणाले की, ‘मडकईकर यांच्याकडील समाज कल्याण खाते मिलिंद यांना मिळाल्याने ते समाजाला अत्यंत उपयुक्त ठरेल. समाजाची अनेक कामे रेंगाळत पडली आहेत. पर्वरी येथे भंडारी समाजासाठी जागा दिली जावी, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी रेंगाळत पडली आहे. सरकारने २७ टक्के राखीवता दिली असली तरी अंमलबजावणीच्या बाबतीत टाळाटाळ केली जाते. उपजिल्हाधिका-यांकडून जातीचे दाखले देण्याबाबत दिरंगाई केली जाते. या सर्व गोष्टी आम्ही आमच्या समाजाच्या मंत्र्यांकडे मांडणार आहोत.’
राज्यात भंडारी समाजाची संख्या मोठी आहे. समाजाच्या दोन गटांमध्ये अलीकडेच समेट होऊन दोन्ही गट एकत्र आल्याने आता दुरावाही राहिलेला नाही. समाजाला मंत्रिमंडळात पुरेसे स्थान मिळायला हवे, अशी समाजाची नेहमीच मागणी राहिलेली आहे.