मगोपच्या तिन्ही आमदारांची पक्षासोबत बैठक, एकत्र असल्याची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 06:24 PM2019-02-25T18:24:48+5:302019-02-25T18:25:32+5:30
मगो पक्षाचे तिन्ही आमदार व मगो पक्षाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष यांची सोमवारी बैठक झाली. आमदार एकत्र आहेत अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. तसेच एकत्रितपणे छायाचित्रही काढून घेतले गेले.
पणजी - मगो पक्षाचे तिन्ही आमदार व मगो पक्षाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष यांची सोमवारी बैठक झाली. आमदार एकत्र आहेत अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. तसेच एकत्रितपणे छायाचित्रही काढून घेतले गेले.
मगो पक्ष शिरोडा मतदारसंघात भाजपविरुद्ध विधानसभेची पोटनिवडणूक लढवत आहे. यामुळे मगोपला सत्तेतून दूर केले जावे, अशी गोवा फॉरवर्ड पक्षाची अपेक्षा होती. पण मगोपला सत्तेतून दूर केले तर येत्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपची दक्षिण गोव्यातील जागा धोक्यात येईल, याची कल्पना भाजपने फॉरवर्डच्या काही नेत्यांना दिली असल्याचे सुत्रांनी सांगितले. बाबूश मोन्सेरात यांच्या मुलाच्या लग्नाच्या स्वागत सोहळ्यावेळी मंत्री व मगोपचे नेते बाबू आजगावकर हे रविवारी रात्री दोनापावल येथे गेले होते. त्यांच्यासोबत मगोपचे सावर्डेचे आमदार दीपक प्रभू पाऊसकर हेही होते. तिथे फॉरवर्डचे मंत्री विजय सरदेसाई, आरोग्य मंत्री विश्वजित राणे व मोन्सेरात हेही बराचवेळ एकत्र बसले. राजकीय विषयांवर चर्चा झाली. यामुळे मगोप फुटेल अशा प्रकारची अफवा नव्याने पसरली.
मगोपचे नेते व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सोमवारी दुपारी आल्तिनो येथे बैठक घेतली. त्या बैठकीत मंत्री आजगावकर, आमदार पाऊसकर, मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर आणि कार्याध्यक्ष नारायण सावंत हे सहभागी झाले. प्राप्त राजकीय स्थितीत राज्यात काहीही घडू शकते, पर्रीकर हे अत्यंत आजारी असल्याने आम्ही कोणत्याही राजकीय प्रसंगाला संघटीतपणे तोंड देण्यासाठी सज्ज राहावे, असे त्या बैठकीत ठरल्याचे पक्ष सुत्रांनी सांगितले.आपण कोणत्याच स्थितीत मगोपला सोडून अन्य कुठेच जाण्याचा विचार देखील करू शकत नाही, असे पाऊसकर यांनी बैठकीत सांगितले.
बैठकीनंतर दीपक ढवळीकर यांनी पत्रकारांना सांगितले, की मगोपला कुणी फोडण्याचा प्रश्नच येत नाही. मगोपचे तिन्ही आमदार संघटीत आहेत. बैठकीत प्रत्येकाने स्वत:च्या भावना व्यक्त केल्या व संघटीत रहावे असे ठरले.