तीन महिन्यांपुर्वी झाली मडगावच्या दामोदर सालात चोरी, अखेर लागला छडा
By सूरज.नाईकपवार | Published: May 20, 2024 04:39 PM2024-05-20T16:39:00+5:302024-05-20T16:39:17+5:30
तीन महिन्यांपुर्वी मडगावच्या दामोदर सालातील झालेल्या चोरीप्रकरणांचा शेवटी छडा लावण्यास फातोर्डा पोलिसांना यश आले आहे.
मडगाव: तीन महिन्यांपुर्वी मडगावच्या दामोदर सालातील झालेल्या चोरीप्रकरणांचा शेवटी छडा लावण्यास फातोर्डा पोलिसांना यश आले आहे. या चोरी प्रकरणात पोलिसांनी विकास वसंत नाईक शिरोडकर याला अटक केली आहे. तो शिरोडा येथील रहिवाशी आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहेत. त्याच्याकडून सत्य वदवून घेण्याचा पोलिस प्रयत्न करीत आहेत. तसेच चोरीला गेलेल्या अलंकाराबाबातही माहिती जाणून घेत आहेत. पोलीस निरीक्षक नॅथन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमीन नाईक पुढील तपास करीत आहेत.
या वर्षी ११ फेब्रुवारी रोजी दिवसाढवळया शहरातील आबाद फारिया मार्गावरील दामोदर सालात चोरीची वरील घटना घडली होती. सुशांत सिनारी यांनी नंतर या प्रकरणी फातोर्डा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. भादंसंच्या ४५४ व ३८० कलामाखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे.
तक्रारदाराने तक्रारीत दुचाकीवरुन आलेल्या एका अज्ञातानो देवालयात शिरुन मुर्तीवरील सोनसाखळी व सोन्याचे पॅडण्ट चोरुन नेल्याचे नमूद केले होते. या ऐवजांची किमंत १ लाख रुपये इतकी आहे. अटक केलेल्या विकास याचा अन्य ठिकाणच्या चोरीतही सहभाग असावा असा पोलिसांना कयास आहे.