१ जुलैपासून तीन नवे फौजदारी कायदे लागू होतील, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
By पूजा प्रभूगावकर | Published: June 18, 2024 02:09 PM2024-06-18T14:09:45+5:302024-06-18T14:09:56+5:30
विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
पणजी: देशात १ जुलै पासून तीन नवे फौजदारी कायदे लागू होतील. यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय न्याय संहिता व भारतीय साक्ष अधिनियम यांचा समावेश आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
राज्यपाल पी. एस श्रीधरन पिल्लई यांच्या उपस्थितीत पणजी येथील आझाद मैदानावर क्रांती दिना निमित आयोजित शासकीय कार्यक्रमात ते बोलत हाेते. देशातून आता ब्रिटीशकालीन कायदे हद्दपार होणार असून त्यांची जागा तीन नवे फौजदारी कायदे घेतील. १ जुलै पासून भारताचे स्वत:चे कायदे देशात लागू होतील असे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री म्हणाले, की या कायद्यांमुळे विकसित भारताचे स्वप्न साकार होण्याबरोबरच देश अधिकच मजबूत बनेल. गोव्याचे पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी १ जुलैपासून लागू होणाऱ्या या तीन नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आढावा घेतला आहे. नुकतीच या नव्या कायद्यांच्या अमलबजावणीबाबत राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोचे संचालक विवेक गोगिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत भाग घेतला होता, असे त्यांनी सांगितले.