उत्तर गोव्यात दोन दिवसात तीन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, सहा जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 08:26 PM2017-11-22T20:26:05+5:302017-11-22T20:26:10+5:30
उत्तर गोव्यातील कळंगुट तसेच हणजूण या दोन जगप्रसिद्ध किनारी भागात दोन दिवसांत तीन सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक केली तर यात गुंतलेल्या पाच युवतींची सुटका केली आहे. त्यात दोन रशियन युवतींचा देखील समावेश आहे.
म्हापसा : उत्तर गोव्यातील कळंगुट तसेच हणजूण या दोन जगप्रसिद्ध किनारी भागात दोन दिवसांत तीन सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक केली तर यात गुंतलेल्या पाच युवतींची सुटका केली आहे. त्यात दोन रशियन युवतींचा देखील समावेश आहे.
बुधवारी (२२ रोजी) कळंगुट पोलिसांनी येथील एका तारांकीत हॉटेलवर धाड घालून केलेल्या कारवाईत दोन दलालांना अटक केली. तर एका मुलीची सुटका केली आहे. पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार कळंगुट भागातील एका हॉटेलमध्ये युवतींना वेश्या व्यवसायासाठी पुरवण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी गुप्त माहिती गोळा करुन हॉटेलवर छापा टाकण्याची तयारी सुरू केली. त्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली.
पथकात दळवी यांच्या सोबत उपनिरीक्षक विदेश पिळगावकर, सीताराम मळीक, महिला उपनिरीक्षक करिष्मा परुळेकर, हवालदार सुभाष मालवणकर, विद्यानंद आमोणकर तसेच बिगर सरकारी संघटनेच्या सदस्यांचा समावेश करण्यात आला. तयार केलेल्या पथकांनी साध्या वेषात सदर हॉटेल बाहेर कारवाई करण्याची तयारी सुरु केली.
त्याच दरम्यान एक व्यक्ती दुचाकीवरुन हॉटेलच्या परिसरात आला. त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता हॉटेलात वेश्या व्यवसायासाठी पुरवण्यात आलेल्या युवतीला नेण्यासाठी आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. लगेच त्या हॉटेलच्या खोलीवर छापा मारण्यात आला. त्यावेळी खोलीत असलेल्या त्या युवतीची सुटका करण्यात आली. तर त्या युवतीसोबत खोलीत असलेल्या चंदन कुमार (३७, गोरेगाव-मुंबई) याला ताब्यात घेण्यात आले. त्या युवतीला १२ हजाराच्या बोलीवर आपण आणल्याचे चंदन कुमार यांनी पोलिसांना सांगितले.
युवतीचा पुरवठा करणारा दलाल रेहन अब्दुल कुरेशी (पालघर मुंबई) याला पोलिसांनी ग्राहक चंदन कुमार याच्या सोबत अटक केली आहे. या छाप्या दरम्यान पोलिसांनी ४ मोबाईल फोन तसेच ५५ हजार रुपयांची रोकड ग्राहक व दलालाकडून ताब्यात घेतली आहे. तसेच युवतीचा पुरवठा करण्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी ताब्यात घेतली आहे. छापासत्र संपल्यानंतर सदर तारांकीत हॉटेलची तसेच तेथील नोंदवहीची पोलिसांनी तपासणी केल्यानंतर हॉटेलला सिल ठोकण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या चंदनकुमारने हॉटेलमध्ये प्रवेश करतेवेळी स्वत:चे ओळखपत्र तसेच इतर कागदपत्रे दिली नसल्याचे आढळून आले आहे. सुटका केलेल्या युवतीची पणजी जवळ असलेल्या मेरशी येथील अपनाघरात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला असून पुढील चौकशी सुरू आहे.
दोन दिवसापूर्वी हणजूण पोलिसांनी दोन वेगवेगळ्या आॅनलाइन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करून रशियन युवतींसह चार युवतींची सुटका केली होती. तसेच चार दलालांनाही अटक केली होती. मागील दोन दिवसात किनारी भागातील पोलिसांनी करण्यात आलेली ही तिसरी कारवाई आहे.
दरम्यान व्हीसाची मुदत संपूनही देशात वास्तव्य करून असलेल्या कझाकिस्तान देशाच्या एका महिला नागरिकाला कळंगुट पोलिसांनी अटक केली आहे. नायला पिल्टस् ३५ वर्षिय महिला बेकायदेशीररित्या वास्तव्य करून राहत असल्याचे पोलिसांना आढळून आले. मागील दोन वर्षांपासून ती कळंगुट परिसरात राहत होती. अटक करून महिलेची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.