गोव्यात कायदा व सुव्यवस्थेचे तीन-तेरा, पोलिसांविरुद्धही गुन्हे नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 01:29 PM2018-07-03T13:29:47+5:302018-07-03T13:32:08+5:30
गोव्यात कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर स्थिती नव्याने निर्माण झालेली आहे. मुरगाव तालुक्यात टॅक्सी चालकाने महिलेवर बलात्कार करणे, ज्येष्ठ नागरिकांवर सुरी हल्ला करू त्यांच्या घरातील लाखोंचे सोने व रोख रक्कम लुटून नेणे, काणकोणमध्ये एका पोलिसाने सरपंचाच्या हाताचा चावा घेणे, पेडण्यात पर्यटकाला पोलिसाने बेदम मारहाण करणे व मग पोलिसाला अटक होणे असे अनेक गुन्हे घटण्याचे सत्रच गोव्यात सुरू आहे.
पणजी : गोव्यात कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर स्थिती नव्याने निर्माण झालेली आहे. मुरगाव तालुक्यात टॅक्सी चालकाने महिलेवर बलात्कार करणे, ज्येष्ठ नागरिकांवर सुरी हल्ला करू त्यांच्या घरातील लाखोंचे सोने व रोख रक्कम लुटून नेणे, काणकोणमध्ये एका पोलिसाने सरपंचाच्या हाताचा चावा घेणे, पेडण्यात पर्यटकाला पोलिसाने बेदम मारहाण करणे व मग पोलिसाला अटक होणे असे अनेक गुन्हे घटण्याचे सत्रच गोव्यात सुरू आहे.
गोवा विधानसभा अधिवेशन येत्या 19 पासून सुरू होत आहे. विरोधी काँग्रेस पक्ष त्यावेळी ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करणार आहेच. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नुकतीच वरिष्ठ पोलिस अधिका-यांची बैठक घेतली. मटका जुगार व अन्य गैरव्यवहारांविरुद्ध कारवाई केली जावी. तसेच पोलीस बंदोबस्त काही भागांमध्ये वाढविला जावा, अशा सूचना गृह खाते सांभाळणा-या मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना केल्या आहेत. त्यानंतर लगेच गोव्याच्या किनारी भागातील मोरजी येथे पोलिसांनी एक मोठा छापा टाकला व त्या छाप्यात मटका अड्ड्यावर 60 लाख रुपये रोख स्वरुपात सापडले. पोलिसांनी 11 जणांना अटक केली आहे. सरकारने मुक्तपणे कारवाई करण्याची मुभा दिल्यानेच एका मटका अड्ड्याविरुद्ध पोलीस कारवाई करू शकले. मात्र राज्यभर असे अनेक अड्डे सुरू असल्याची चर्चा अनेक आमदारांमध्ये सुरू आहे.
राज्यातील वाढत्या अंमली पदार्थ व्यवहारांविरुद्धही जोरदार चर्चा सुरू आहे. आम्ही सगळेच अंमली पदार्थ व्यवहारांना पायबंद घालण्यात अपयशी ठरल्याचे खुद्द पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनीच सोमवारी पणजीत पत्रकारांशी बोलताना नमूद केले. मटका जुगारापेक्षाही गोव्यात अंमली पदार्थ विक्रीचा धंदा ही फार मोठी व गंभीर गोष्ट असल्याचे मंत्री आजगावकर म्हणाले. गोव्यातील वाढत्या ड्रग्ज व्यवहारांविरुद्ध काँग्रेसचे आमदार दयानंद सोपटे यांनीही चिंता व्यक्त केली.
गोवा हे पर्यटन राज्य आहे. या राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडणे हे पर्यटन व्यवसायाच्या हिताचे नाही. एका टॅक्सी चालकाने महिलेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्याची घटना घडली. पोलिसांनी आरोपीस अटक करण्यात यश मिळविले. त्यानंतर लगेच गिरदोली-चांदोर येथे चोरट्यांनी एका घरातील ज्येष्ठ नागरिकांवर सुरी हल्ला करून त्यांच्या घरातील ऐवज लुटण्याची घटना घडली. या प्रकरणीही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. पेडण्यात सोमवारी एका पर्यटकाला पोलिसाने व त्या पोलिसाच्या मित्राने मिळून बेदम मारहाण केली. याबाबत पोलिसाला अटक झाली आहे. गेल्या चार दिवसांत दोघा पोलिसांना दोन वेगवेगळ्य़ा गुन्ह्यांत अटक झाली आहे.