प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रामार्फत दिव्यांगांना आता मोफत उपकरणे : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 03:46 PM2024-01-10T15:46:30+5:302024-01-10T15:46:40+5:30
प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रामार्फत राज्यातील सर्व दिव्यांग तसेच वरिष्ठ नागरिकांना लागणारी उपकरणे आता माेफत मिळणार आहेत.
नारायण गावस
पणजी : प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रामार्फत राज्यातील सर्व दिव्यांग तसेच वरिष्ठ नागरिकांना लागणारी उपकरणे आता माेफत मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या योजनांचा दिव्यांग लोकांनी लाभ घ्यावा. आता अनेक वर्षे दिव्यांग व्यक्तीला लागणाऱ्या वस्तूंसाठी वाट पाहण्याची गरज भासणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. बांबाेळी येथील गाेवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पहिले प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्यांच्या सोबत मडगावचे आमदार दिगंबर कामात, राज्य दिव्यांग आयोगाचे आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, गाेवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात कुठल्याच दिव्यांग तसेच वरिष्ठ व्यक्तींना लागणाऱ्या उपकरणांसाठी वंचित राहू नये यासाठी हे दिव्याशा केंद्र आहे. यात त्यांना लागणारे व्हीलचेअर, ऐकायला येणारे कानाचे मशीन, दृष्टीचे मशीन, तसेच इतर दिव्यांगांना लागणाऱ्या वस्तूंचा समावेश आहे. यासाठी या वस्तू लागणाऱ्या लोकांना केंद्राकडे अर्ज करावे लागणार आहे. लवकरच त्यांना ही उपकरणे मिळणार आहेत. आता त्यांना पैसे माेजण्याची तसेच ताटकळत वाट पाहण्याची गरज भासणार नाही. एएलआयएमसीओ या कंपनीमार्फत सरकारने हा पुढाकार घेतला आहे, असे यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
मुख्यंमत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी काही दिव्यांग व्यक्तीला कानाचे मशीन, व्हीलचेअर तसेच इतर वस्तूही दिल्या. पर्पल फेस्टिव्हलच्या निमित्ताने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. हे देशातील ४६ वे केंद्र आहे. तर, राज्यातील पहिले केंद्र आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.