नोकऱ्या आयोगामार्फतच; सावध राहा, नोकऱ्यांसाठी पैसे देऊ नका: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2024 08:38 AM2024-10-31T08:38:40+5:302024-10-31T08:39:47+5:30
परीक्षा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी निकाल जाहीर होणार
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जाहिरात न केलेल्या पदांसाठीही लोक पैसे देऊन मोकळे होतात. पदवीधर सुशिक्षितही फालतू माणसांच्या कारनाम्यांना बळी पडतात. लोकांनी सावध राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी केले. आता कर्मचारी निवड आयोगातर्फे गुणवत्तेवरच नोकऱ्या दिल्या जातील. परीक्षा झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर केला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले की, 'नोकऱ्यांसाठी पैसे उकळणाऱ्या कोणाचीही सरकार गय करणार नाही. त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई केली जाईल. सामान्य व्यक्तीपासून राजकारण्यांपर्यंत कोणीही सुटणार नाही. गुणवत्तेवरच नोकऱ्या दिल्या जातील. लवकरच कर्मचारी निवड आयोगाकडून जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील. आयोगाची स्थापनाच मुळात नोकर भरतीतील घोटाळे रोखण्यासाठी केलेली आहे,' असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.
सध्या गाजत असलेल्या पूजा नाईक प्रकरणाबद्दल, तसेच काणकोण व इतर ठिकाणी सरकारी नोकरीच्या नावाखाली युवक-युवतींना जो गंडा घालण्यात आला आहे, त्यासंबंधी विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की, 'सरकारने हे प्रकार गंभीरपणे घेतलेले आहेत. यातून कोणीही सुटणार नाही.' २०२१ साली गाजलेल्या बांधकाम खात्यातील नोकर भरती घोटाळा प्रकरणी विचारले असता ते म्हणाले की, 'काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत, तर काही पोलिसांकडे आहेत.
'पुढे येऊन तक्रारी द्या'
मुख्यमंत्री म्हणाले की, कोणीही अशी फसवणूक करताना आढळल्यास पोलिसांना कळवा. ज्यांची फसवणूक झालेली आहे, त्यांनी पुढे येऊन पोलिसात तक्रारी कराव्यात. संबंधितांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. नोकर भरती भ्रष्टाचाराची जी काही प्रकरणे पोलिसांकडे असतील, त्या सर्व प्रकरणात आरोपपत्रे सादर करून पुढील कारवाई केली जाईल.'
'प्रदूषण नकोच'
राज्य मानवी हक्क आयोगाने दिवाळीत नरकासूर मंडळांना गोंगाट व आवाज प्रदूषण न करण्याबाबत दिलेल्या इशाऱ्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सण साजरे करताना लोकांनी ध्वनी आणि वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवायलाच हवे. इतर नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
१२ हजार विद्यार्थ्यांना मोफत चष्मे
'स्वयंपूर्ण गोवा' उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या ३३ हजार विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. १२ हजार विद्यार्थ्यांना मोफत चष्मे दिले. आठ ते दहा विद्यार्थ्यांच्या डोळ्ळ्यांवर किरकोळ शस्त्रक्रिया केल्या आहेत.
फळे कृत्रिमरीत्या पिकवणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई
म्हापसा यार्डात केळी तसेच अन्य फळे कृत्रिमरीत्या पिकविण्यासाठी रसायनांची फवारणी करणाऱ्या ज्या व्यक्तीला अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी पकडले आहे, तिला तुरुंगात टाकले जाईल आणि त्याचे दुकानही बंद केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. म्हापसा यार्ड मधून बेळगावच्या विक्रेत्याला ९ क्विंटल केळींवर रसायनाची फवारणी केल्याबद्दल अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. त्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्र्यांनी वरील उत्तर दिले.