मरिनाविरोधात वाघ-सिल्वेरा एकत्र
By admin | Published: May 15, 2015 01:23 AM2015-05-15T01:23:04+5:302015-05-15T01:23:16+5:30
मरिनाविरोधात वाघ-सिल्वेरा एकत्र
पणजी : न्हावशी-बांबोळी येथे होऊ घातलेल्या मरिनाविरोधात राजकीय शत्रू मानले जाणारे सांत आंद्रेचे भाजप आमदार विष्णू वाघ व काँग्रेसचे माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा गुरुवारी एका व्यासपीठावर आले. बांबोळीत मरिना होऊ दिला जाणार नाही, असा इशारा दोघांनीही दिला आहे.
न्हावशी येथे गुरुवारी स्थानिकांची या प्रश्नावर सभा झाली. एमपीटी बांधत असलेल्या या मरिनामुळे मोठ्या प्रमाणात बोटी या ठिकाणी येतील आणि प्रदूषण होईल. तसेच मच्छीमारांचे उदरनिर्वाहाचे साधन नष्ट होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे हा प्रकल्प नकोच, अशी भूमिका स्थानिकांसह तेथील लोकप्रतिनिधींनीही घेतलेली आहे.
या प्रश्नावर आमदार वाघ यांच्या नेतृत्वाखाली मरिनाविरोधी लोक चळवळ संघटना स्थापन करण्यात आली. कुडका-बांबोळीच्या सरपंच मारिया कुन्हा, उपसरपंच डायना कोरगावकर, पंच घन:श्याम वेर्णेकर, सुभाष शिरोडकर, सुषमा शिरोडकर, सुमिता काणकोणकर, कॉस्मे पिरीस, सामाजिक चळवळींमधील नेते सेबी रॉड्रिग्स, मॅगी सिल्वेरा, संजय परेरा, जॉन वेगास आदी या वेळी उपस्थित होते.
दुपारी सभेला जमलेल्या सुमारे दोनशेहून अधिक लोकांनी हात उंचावून हा प्रकल्प होऊ देणार नाही, असा निर्धार केला. (प्रतिनिधी)