तिळारीचे पाणी पणजीत आणणार: जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2025 10:33 IST2025-02-11T10:32:52+5:302025-02-11T10:33:31+5:30
मांडवी नदीत पाण्याखाली जलवाहिनी टाकू, दोन वर्षांत अंमलबजावणी

तिळारीचे पाणी पणजीत आणणार: जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'तिळारी प्रकल्पाचे पाणी पणजीत आणण्यासाठी मांडवी नदीत पाण्याखाली पाइपलाइन टाकली जाईल,' असे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सोमवारी स्पष्ट केले.
याबाबत माहिती देताना मंत्री शिरोडकर म्हणाले की, 'खात्याने यासंदर्भात आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले असून पुढील दोन वर्षांत अंमलबजावणी होईल. तिळारीचे पाणी सध्या पर्वरीपर्यंत येते. पर्वरीचा १५ एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प तिळारीच्या पाण्यावरच अवलंबून आहे. मांडवी नदीमुळे हे पाणी पुढे पणजी शहरापर्यंत घेता आलेले नाही. आता नदीपात्रात पाइपलाइन टाकून ते राजधानी शहरापर्यंत आणण्याचा विचार आहे.'
चिंबलच्या बेकायदा बोअरवेल्स बंद करणार
चिंबल येथे वादग्रस्त ठरलेल्या बेकायदा बोअरवेल्स बंद करणार असल्याचे मंत्री शिरोडकर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, 'चिंबल भागात ६० ते ७० बोअरवेल्स आहेत. त्यांची पाहणी करण्याचे निर्देश मी दिले आहेत. सर्व बेकायदा बोअरवेल्स बंद केल्या जातील. शुक्रवारी काही जणांना नोटिसाही पाठवल्या आहेत. पोलिसांची मदत घेऊन बेकायदा बोअरवेल्स बंद केल्या जातील. गोवा भूजल कायद्याखाली स्वरूपात पाच ते दहा लाख रुपये दंडाची तरतूद आहे. हा दंडही आम्ही संबंधितांना ठोठावणार आहोत.'
सजग नागरिकाची तक्रार
दरम्यान, एका जागरूक नागरिकाने तक्रार केल्यानंतर वरील प्रकार उघडकीस आले आहेत. बोअरवेल किंवा विहिरी खोदताना लोकांनी आवश्यक ते सर्व परवाने घ्यायला हवेत. बेकायदा बोअरवेल्स व विहिरींच्या माध्यमातून काही लोक टँकरवाल्यांना पाणी विकत असल्याचेही निष्पन्न झालेले आहे. त्यामुळे सरकारने कठोर भूमिका घेतली आहे.