कॅसिनो तूर्त मांडवीतच!
By admin | Published: August 29, 2015 02:39 AM2015-08-29T02:39:50+5:302015-08-29T02:39:50+5:30
पणजी : मांडवी नदीतील चारही कॅसिनो जहाजे पर्यायी जागा मिळेपर्यंत तरी मांडवीतच राहणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. कॅसिनोंच्या परवान्यांची मुदत संपण्यास शनिवार, २९ रोजी आरंभ होत आहे.
पणजी : मांडवी नदीतील चारही कॅसिनो जहाजे पर्यायी जागा मिळेपर्यंत तरी मांडवीतच राहणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. कॅसिनोंच्या परवान्यांची मुदत संपण्यास शनिवार, २९ रोजी आरंभ होत आहे. त्यामुळे चारही कॅसिनोंच्या परवान्यांची मुदत येत्या ३१ मार्च २०१६ पर्यंत वाढविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने शुक्रवारी घेतला.
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर पार्सेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले की, मांडवीतून कॅसिनो जहाजे अन्यत्र हलविण्यासाठी सरकारचे बंदर कप्तान खाते पर्यायी जागा शोधत आहे. तूर्त चार पर्यायी जागा शोधल्या आहेत. सरकारने त्या अधिसूचितही केल्या व पंधरा दिवसांपूर्वी लोकांकडून सूचना मागविल्या. काही सूचना व आक्षेप लोकांनी सादर केले आहेत.
ते म्हणाले, येत्या ३१ मार्च २०१६ पर्यंत जर पर्यायी जागा मिळाली तर जहाजे मांडवीतून पर्यायी जागांवर नेली जातील, अन्यथा आणखी काय उपाययोजना करता येईल ते सरकार पाहील. आम्ही एकदम कॅसिनो बंद करू शकत नाही; कारण त्यावर अडीच हजार लोकांचा रोजगार अवलंबून आहे. काहीजणांनी कॅसिनो मांडवीतच असू द्या, अशी देखील सूचना केली आहे. विद्यमान सरकार जसे लोकांचे आहे, तसेच ते गुंतवणूकदारांचेही आहे. कॅसिनो व्यावसायिकांनी प्रचंड गुंतवणूक केली आहे. आम्ही कोणताही चुकीचा निर्णय घेतला तर ते न्यायालयात
जाऊन स्थगिती आणतील.
ते म्हणाले, कॅसिनो जहाजांमुळे आता मांडवी नदी प्रदूषित होत नाही. त्याबाबत आम्ही उपाययोजना केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने उपाय योजले आहेतच. शिवाय एनआयओ, एनआयटी व अन्य अधिकाऱ्यांचा, तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती मांडवी नदी आणि कॅसिनोंची वारंवार पाहणी करत आहे. आम्ही अत्यंत खोल समुद्रात कॅसिनोंना पाठवू शकत नाही; कारण खोल समुद्रात फक्त मोठी जहाजेच राहू शकतात. आम्ही मांडवीतील कॅसिनोंना विविध ठिकाणच्या नद्यांमध्ये जागा देऊ पाहत आहोत. तथापि, तूर्त सूचना व आक्षेपांचा अभ्यास सुरू आहे.
(खास प्रतिनिधी)