‘टाइम आउट सेव्हन्टी टू’ ईडीएमच्या मागे वाणिज्य कर खात्याचा ससेमिरा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 02:10 PM2018-01-02T14:10:56+5:302018-01-02T14:11:15+5:30
वागातोर येथे २७ ते २९ डिसेबर या कालावधीत झालेल्या ‘टाइम आउट सेव्हन्टी टू’ इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टिव्हलचे आयोजक सुदर्शन एंटरटेन्मेंट कंपनीला वाणिज्य कर खात्याने तीन दिवसांच्या उलाढालीबाबत विचारणा केली आहे.
पणजी : वागातोर येथे २७ ते २९ डिसेबर या कालावधीत झालेल्या ‘टाइम आउट सेव्हन्टी टू’ इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टिव्हलचे आयोजक सुदर्शन एंटरटेन्मेंट कंपनीला वाणिज्य कर खात्याने तीन दिवसांच्या उलाढालीबाबत विचारणा केली आहे. या तीन दिवसांच्या काळात ५५ हजारांवर लोकांनी या डान्स पार्टीत भाग घेतल्याचा अंदाज आहे. कोणत्या दराची किती तिकिटे विकली गेली याचा तपशील खात्याच्या अधिकाºयांनी मागितला आहे.
वाणिज्य कर आयुक्त दिपक बांदेकर यांनी यास दुजोरा दिला. आयोजकांनी हिशोब सादर करण्यासाठी आठवडाभराची मुदत मागितली आहे. या डान्स फेस्टिव्हलच्या काळात खात्याचे अधिकारीही प्रत्यक्ष तेथे हजर होते व त्यांची निगराणी पार्टीवर होती. दर दिवशी १५ हजार ते २0 हजार लोकांनी हजेरी लावल्याचा अंदाज आहे. तुलनेत पहिल्या दिवशी गर्दी कमी होती, परंतु नंतरचे दोन्ही दिवस गर्दी वाढली. खात्याच्या अधिकाऱ्यांनी काढलेल्या अंदाजानुसार पहिल्या दिवशी ८ हजार, दुसऱ्या दिवशी १५ हजार तर तिसऱ्या दिवशी ३२ हजार लोकांनी या डान्स पार्टीत भाग घेतला.
खात्याकडे अंदाजित आकडा असला तरी किती किमतीची किती तिकिटे विकली गेली व प्रत्यक्षात किती उलाढाल झाली याचा नेमका आकडा नाही. १,९९९ रुपयांपासून १४,९९९ रुपयांपर्यत तिकिटे होते. शिवाय व्हीआयपी, पॅकेज डील वेगळे होते. आॅनलाइनव्दारे तिकीटे विकली गेलेली आहेत. अन्नपदार्थ व मद्याची सुमारे १ कोटी १0 लाख रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. पहिल्या दिवशी १७ लाख, दुसऱ्या दिवशी २३ लाख तर तिसºया दिवशी ७0 लाख रुपयांची उलाढाल झाली. कंपनीने अधिकृतपणे उलाढाल जाहीर केल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल.
या डान्स पार्टीतून मिळणारा जीएसटीमध्ये राज्य सरकार व केंद्र सरकारचा प्रत्येकी निम्मा वाटा असेल. २0१३-१४ साली सुपरसोनिक व सनबर्न हे दोन मोठे डान्स पार्टी इव्हेंट झाले होते. या पार्ट्यांच्या आयोजकांकडून साडेआठ कोटी रुपये सरकारला येणे आहेत त्यामुळे सनबर्नला यंदा परवानगी नाकारण्यात आली.